विमानतळाची सुरक्षा, विमानतळावरील आपत्ती व्यवस्थापन यासाठी आता उर्दू, पुश्तो, काश्मिरी भाषा येणाऱ्या प्राध्यापकांची मदत घेण्यात येणार आहे. अशा प्राध्यापकांची माहिती पाठवण्याची सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला केली आहे.
विमानतळाची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत उपाययोजना करण्यासाठी एअरोड्रम समिती स्थापन करण्यात आली आहे. विंग कमांडर सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. विमानतळाची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन, विमान कोसळणे, अपहरण होणे यासारख्या आपत्तीच्या परिस्थितीत करायचे व्यवस्थापन याबाबत अहवाल दिला होता. या अहवालानुसार विविध भाषांच्या जाणकारांची मदत घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्या अनुषंगाने काश्मिरी, पुश्तो, उर्दू या भाषा येणाऱ्या प्राध्यापकांची माहिती देण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाला पाठवण्यात आले आहे.
‘आपल्या विद्यापीठात विविध भाषा शिकवणाऱ्या अनेक संस्था आहेत. या संस्थांमधील काश्मिरी, पुश्तो किंवा उर्दू भाषेच्या जाणकारांची माहिती पाठवावी. भाषांतर करू शकणारी व्यक्ती किमान पाच वर्षे पुण्यातच राहणारी असावी. प्रत्येक भाषेच्या किमान पाच जाणकारांची माहिती पाठवण्यात यावी. माहिती पाठवल्यावर तपशिलात काही बदल झाल्यास, तो तत्काळ कळवण्यात यावा,’ असे पत्र विद्यापीठाला पाठवण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून हे पत्र पाठवण्यात आले आहे.