शास्त्री रस्त्यावर असलेल्या ‘अजंठा’मध्ये गेल्यानंतर तिथे गल्ल्यावर बसणाऱ्या अभ्यंकर काकांशी पदार्थाची ऑर्डर देणं आणि पैसे देणं इतकंच काय ते बोलणं व्हायचं. काकांबद्दल नेहमी कुतूहल वाटायचं. काका तसे मितभाषी. तरीही त्यांनी केवळ हसून स्वागत केलं आणि एखादं वाक्य बोलले तरी बरं वाटतं. मध्यंतरी एकदा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. त्यातून ‘अजंठा’ची माहिती मिळाली. आठ चवींची श्रीखंडं, पाच प्रकारचे पेढे, अनेक प्रकारचे लाडू, वेगळ्या चवीचं इडली सांबार, आकार आणि चवीत वैशिष्टय़ं राखून असलेला बटाटा वडा, संध्याकाळी मिळणारी भेळ.. ‘अजंठा’च्या वैविध्यतेची ही यादी आणखीही लांबू शकेल. पण ही यादी वाचण्यापेक्षा इथल्या वैविध्यपूर्ण पदार्थाचा आस्वाद घेण्यातला आनंद काही वेगळाच आहे.
‘अजंठा’चं स्वरुप हॉटेल आणि मिठाईचं दुकान असं दुहेरी आहे. बी. एस्स.सीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर अशोक अभ्यंकर यांना चांगली नोकरी अगदी सहज मिळाली असती, पण त्या मार्गाकडे न वळता त्यांनी त्यांचे काका नारायण अभ्यंकर यांच्या सल्ल्यानुसार हा व्यवसाय निवडला आणि ‘स्वीट होम’ चालवणारे नारायण अभ्यंकर यांचं मार्गदर्शन घेऊन ‘अजंठा’ सुरू झालं. ही गोष्ट आहे १९६८ मधील. ‘अजंठा’चं सुरुवातीचं स्वरुप बेकरीचं होतं. बेकरीतील सर्व पदार्थ आणि दूध एवढाच व्यवसाय होता. पुढे पाच वर्षांनी अभ्यंकर यांनी मिठाई उत्पादन सुरू केलं. पुढे दुकानाशेजारीच आणखी एक दुकान मिळालं आणि त्यातून छोटं स्नॅक्स सेंटर सुरू झालं. त्यात मुख्यत: भेळ, भेळपुरी, शेवपुरी असे पदार्थ मिळायचे. हा व्यवसाय करता करता पुढे १९७८ मध्ये दुकानासमोर एक जागा मिळाली आणि अभ्यंकरांनी त्या जागेत छोटं किचन सुरू करून काही मोजके खाद्यपदार्थ तेथे बनवण्यास प्रारंभ केला. अगदी सुरुवातीला सामोसे आणि बटाटेवडे तयार केले जायचे आणि ते दुकानात आणून विकले जायचे. त्यानंतर दुकानाच्याच मागे एक जागा मिळाली आणि ‘अजंठा’ला हॉटेलचं स्वरुप प्राप्त झालं.
मिठाई, वडा, भेळ वगैरेसाठी प्रसिद्ध झालेल्या ‘अजंठा’मध्ये मग इडली सांबार, उडीद वडा सांबार, मिसळ, बटाटा वडा, पोहे, कांदा भजी, गोल भजी, आळू वडी, सुरळी वडी आदी अनेक पदार्थ मिळायला लागले. हे पदार्थ खवय्यांच्या चांगलेच पसंतीला उतरले. ‘अजंठा’ कशासाठी प्रसिद्ध आहे तर ‘सांबारसाठी’ असं सांगावं लागेल आणि ‘श्रीखंडासाठी’ अशीही पुस्ती जोडावी लागेल. तिखट तरीही चविष्ट, र्तीदार पण खूप तेलकट नसलेलं असं इथलं सांबार इडली, वडा किंवा बटाटा वडा यांच्याबरोबर खाण्याची रंगत काही वेगळीच. बरोबर शेवेची प्लेट मात्र हवी. किंचित गोडसर चवीचे पोहे, शेव आणि हाफ सांबार असाही बेत तुम्ही इथे जमवू शकता किंवा थेट मिसळ मागवून मिसळीचाही आनंद घेऊ शकता. अर्थात हे काहीही घेतलं तरी इथे जाऊन बटाटा वडा घ्यायचा नाही, असं मात्र कधी करायचं नाही. आकारानं मोठा आणि अत्यंत चविष्ट असा इथला वडा आवर्जून घ्यावाच लागतो. सातत्यानं एकच चव आणि त्यात किंचितही कधी बदल नाही, हे ‘अजंठा’चं वैशिष्टय़ं आहे.
इथलं आणखी एक आकर्षण म्हणजे श्रीखंडाचे आठ डबे. अभ्यंकर काकांना नवनवीन प्रयोग करून पाहण्याची खूप आवड आहे. ते अनेक वर्ष श्रीखंड आणि आम्रखंड विकत होते. त्यातून अन्य स्वादांची कल्पना त्यांना सुचली आणि मुलगा अमित याच्या मदतीनं एकेक प्रयोग करत करत त्यांनी आठ प्रकारची श्रीखंडं तयार केली. श्रीखंडाचे हे सर्वच प्रकार आता लोकप्रिय झाले आहेत. श्रीखंड, आम्रखंडाबरोबरच पायनापल, सीताफळ, अंजिर, स्ट्रॉबेरी, पिस्ता-बदाम आणि बटरस्कॉच एवढे इथले श्रीखंडाचे प्रकार. या शिवाय सर्व प्रकारची मिठाई, लाडू, फरसाण, बाकरवडी, चिवडा यासह अनेक खाद्यपदार्थही इथे मिळतात. शिवाय इथे अगदी नव्यानं सुरू झालेले बटाटा वडा दही चाट, शेजवान वडा पाव, चीज वडा पाव हे पदार्थही खाऊन बघायला हरकत नाही.
कुठे आहे?
शास्त्री रस्त्यावर, पाषाणकर होंडाशेजारी
सकाळी दहा ते दुपारी दोन आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ
बुधवारी बंद