उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असून अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याची बारकाईने माहिती आहे. त्यामुळे अजित पवार हे पालकमंत्री झाल्याने अधिक चांगलं काम करतील, असा विश्वास अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे. ते लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होते.
हेही वाचा – पुण्यात वृक्ष संवर्धन, देखभालीसाठी ३६ लाखांची उधळण?
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, अजित पवारांना पालकमंत्री केल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नक्कीच ताकद वाढली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे यासह जिल्ह्यातील बारीक-सारीक गोष्टी अजित पवारांना माहिती आहेत. त्यांचं विशेष लक्ष जिल्ह्यावर असतं. अजित पवारांकडे काम करण्याचं सातत्य आहे, अधिकाऱ्यांवर पकड आहे. याचा फायदा निश्चितच पिंपरी-चिंचवड शहराला होईल. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. चंद्रकांत पाटलांपेक्षा अजित पवारांना दोन्ही शहरांतील प्रत्येक बारीक गोष्टी माहिती आहेत. त्यामुळेच अजित पवारांचं काम हे चांगलं आहे. असं गव्हाणे म्हणाले.