भोसरी मतदारसंघांमध्ये शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे सापडले आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली. असा फेक नेरेटिव्ह पसरवला गेला. यातून जाणीवपूर्वक नागरिकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला. वारंवार अशा प्रकारचे प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होत आहेत. पोलीस, निवडणूक विभाग या सर्वांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले. महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव होताना दिसत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक नागरिकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली असून गेल्या दहा वर्षातल्या दहशत, दडपशाहीला नागरिक चोख उत्तर देतील असे देखील अजित गव्हाणे म्हणाले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेला माजी आमदार विलास लांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उमेदवार अजित गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते भरत लांडगे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी

अजित गव्हाणे म्हणाले, भोसरी मतदारसंघांमध्ये जाणीवपूर्वक फेक नेरेटिव्ह सेट केला जात आहे. शनिवारी रात्री मतदारसंघातील गव्हाणे वस्ती भागामध्ये दोन कोटी रुपये सापडले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती पसरवण्यात आली. असा काही प्रकार घडलेला नसताना जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवली जात असल्याची तक्रार आम्ही पोलिसांकडे केली आहे. दोन महिन्यापूर्वीच दिघी पोलीस ठाण्यामधील काही पोलीस कर्मचारी वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी काम करत असून याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. याबद्दल आम्हाला जशी शक्यता होती तेच प्रकार सध्या घडताना दिसत आहे. आज त्याबद्दलची तक्रारही पोलीस आणि निवडणूक विभागाकडे केली आहे. संबंधित पोलीस खुलेआम भाजप आमदाराला सहकार्य करत आहे. हे प्रकार राजरोसपणे दिसत असतानाही त्यांच्या बाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्यामुळे हे लोकशाहीचे राज्य आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

भोसरीमध्ये शनिवारी रात्री जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवण्यात आली. आमची बदनामी करण्यात आली. विरोधी उमेदवाराकडून करण्यात येत असलेले हे प्रकार म्हणजे त्यांना पराभव समोर दिसत आहे. ही निवडणूक आता नागरिकांनी हातामध्ये घेतले आहे. दहशत, दडपशाही झुगारून नागरिक परिवर्तनाच्या मानसिकतेमध्ये आहे. राज्यभर देखील नागरिक परिवर्तनाच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्र पेक्षा गुजरातच्या विकासाचा विचार भाजपचे नेते करताना दिसून येत आहे. तरुणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे महाराष्ट्रातील सरकार बदलणार ही वस्तुस्थिती आहे असे देखील गव्हाणे यावेळी म्हणाले.

हेही वाचा >>>वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी

विलास लांडे म्हणाले, जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यातून कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. संभ्रम निर्माण केला जात आहे. खोटी माहिती मतदारसंघात पसरवली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त निवडणूक विभाग अशा सगळ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र कारवाई होताना दिसत नाही. शनिवारी रात्री भोसरीमध्ये जो प्रकार घडला, जी बदनामी करण्यात आली. असा कोणता प्रकार घडला हे देखील पोलीस सांगत नव्हते. रात्री दोन वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये बसून होते. मात्र नक्की काय घडले? कुठे पैसे सापडले याबद्दल पोलिसांनाही नीट माहिती देता आली नाही. जाणीवपूर्वक हे प्रकार घडत असून पोलीस निवडणूक विभाग यांनी याची दखल घेतली पाहिजे असे लांडे यावेळी म्हणाले.