उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला आणि एकप्रकारे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. पिंपळे सौदागर, आकुर्डी आणि भोसरीत स्वतंत्र बैठका घेत राष्ट्रवादीच्या तीनही अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना केले. दिवसा एक, रात्री एक प्रचार करू नका, सारख्या टोप्या बदलू नका, पक्षविरोधी काम केल्यास माझ्याशी गाठ असून पदे देऊ शकतो तसेच ती काढून घेऊ शकतो, अशी तंबी त्यांनी दिली. गद्दार या शब्दाला लाजवेल, अशी कृती करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना चारी मुंडय़ा चीत करा, असे आदेशही त्यांनी दिले.
राष्ट्रवादीचे चिंचवडचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी ‘शिवार गार्डन’ येथे, पिंपरीतील उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यासाठी आकुर्डीत ‘ब्रम्हा’ येथे तर भोसरीचे उमेदवार विलास लांडे यांच्यासाठी भोसरीत अजितदादांनी बैठक घेतली. शहराध्यक्ष योगेश बहल, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत गावडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी अजितदादांनी ‘डबलरोल’ करणाऱ्या कार्यकर्त्यांची हजेरी घेतली.
पवार म्हणाले, राजकारणात यश-अपयश येत असते. लोकसभेत पराभव झाला असला तरी पालिकेत यश मिळाल्याचे विसरू नका. आपली कामे जनतेपुढे मांडा. राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांचे श्रेय जगताप घेत आहेत. काम राष्ट्रवादीचे आणि फोटो मोदींचे लावून ते लोकांना फसवत आहेत. अधिकृत उमेदवाराचे काम करा, दुसरा विचार करू नका, जर एखाद्याने कमळ चालवले तर गय करणार नाही. टोप्या बदलू नका, इकडून तिकडे उडय़ा मारू नका, ते जनतेला आवडत नाही. कमळ चालवायचे असल्यास राजीनामे द्या, गद्दारी करू नका. भाजप हा जातीय वादी पक्ष असून त्यांचा पिंपरी-चिंचवडशी काय संबंध, त्यांची तिकडे उडी गेलीच कशी, असा प्रश्न त्यांनी केला. संपूर्ण बहुमत द्या, १०० दिवसात शास्तीकराचा प्रश्न निकाली काढू, असेही ते म्हणाले.
गद्दार शब्दाला लाजवेल, अशी कृती करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना चारी मुंडय़ा चीत करा – अजित पवार
गद्दार या शब्दाला लाजवेल, अशी कृती करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना चारी मुंडय़ा चीत करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-10-2014 at 03:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pavar orders to defeat laxman jagtap