पुणे : पहिल्या दोन वर्षातच खासदार अमोल कोल्हे कंटाळले होते. राजीनामा देण्याचे ते बोलत होते. यात चूक आमचीच आहे. विकासकामे करण्याची आवड आहे की नाही, हे पहायला हवे होते. कोल्हे यांना उमेदवारी देऊन, त्यांचा प्रचार करून आमचीही चूक झाली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार यांनी सोमवारी शिरूरमध्ये शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, वक्तृत्व चांगले आहे. दिसायलाही रुबाबदार आहे. पुढे काही तरी चांगले काम करतील, असे वाटल्यानेच अन्य पक्षाचे असतानाही त्यांना उमेदवारी दिली. मात्र ते दोन वर्षातच कंटाळले. निवडून आल्यानंतर दोन वर्षांतच कोल्हे यांनी राजीनामा देण्याची भाषा सुरू केली. जनतेने पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यामुळे दोन वर्षांत राजीनामा देणे योग्य नाही, असे मी त्यांना सांगितले. मात्र कलावंत असल्याने त्याचा व्यावसायावर परिणाम होत आहे. सेलिब्रेटी असल्याने रोज मतदारसंघात येणे शक्य नाही, असे कोल्हे यांनी सांगितले. कोल्हे यांना तुम्हीच पक्षात घेतले आहे, तुम्हीच त्यांची समजूत काढा, असे पक्षाचे नेते मला सांगत होते.

हेही वाचा >>>माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? अजित पवार-पाटील एकत्र प्रवास

कोणाच्या डोक्यात काय आहे, हेच कळायला मार्ग नव्हता. राजकारण हा त्यांचा पिंड नाही. एखाद्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी हेमा मालिनी, धर्मेंद्र, गोविंदा, सनी देओल निवडणुकीला उभे रहातात. लोक त्यांच्याकडे पाहून मतदान करताना. मात्र त्यांचा राजकारणाशी काय संबंध नाही. विकासकामे करण्याची आवड आहे की नाही, हे पहायला हवे होते. ती चूक झाली, असे पवार यांनी सांगितले.

पक्षात येण्यासाठी निरोप का पाठविले?

शरद पवार यांनी मला निवडणुकीची संधी दिली. कलावंताला उमेदवारी देणे ही चूक होती, असे पवार म्हणत आहेत. त्यांनी काही कलावंतांचीही उदाहरणे दिली. मात्र त्यांनी दिलेल्या एकाही खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मांडताना मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर नकरण्याचा राजकारणातील अलिखीत नियम आहे. तो मी नेहमीच पाळतो. मात्र सातत्याने आरोप करत असाल तर आणि माझ्यासारख्या कलावंताला उमेदवारी देणे चूक असेल तर दहा-दहा वेळा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप का पाठविण्यात आले. लपून-छपून भेटीगाठी करण्याचे कोणते कारण होते, असा सवाल खासदार कोल्हे यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar admits that it was a mistake to nominate dr amol kolhe pune print news apk 13 amy