महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन आपसातील मतभेद बाजूला ठेवा. एकदिलाने पक्षासाठी काम करा. महापालिकेत लोकहिताचे निर्णय घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होईल असे निर्णय पालिकेत घेऊ नका, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी पक्षाच्या नगरसेवकांना योग्यप्रकारे काम करण्याचा सल्ला दिला.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश  काकडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. बैठकीत पवार यांनी अनेक विषयांचा सविस्तर उहापोह केला.
श्रावणधारा, हिराबाग या महापालिकेची मालकी असलेल्या जागांवर बांधकाम व्यावसायिकाला झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यास महापालिकेने परवानगी दिल्याबद्दल पवार यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या जागेवर उद्या कुणालाही परवानगी द्याल. मात्र अशा निर्णयांमुळे पक्षाची बदनामी होते. त्यामुळे पालिकेची मालकी असलेल्या जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घ्या. अशा प्रकल्पांना महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आयुक्तांना द्या, असे पवार यांनी बैठकीत सांगितले. पवार यांनी हा विषय मांडल्यानंतर ‘हा निर्णय घ्यायला तुम्हीच सांगितले आहे असे आम्हाला सांगण्यात आले होते,’ असे एका नगरसेवकाने सांगताच, मी असले काही सांगत नाही. याउलट हा विषय करण्याबाबत इतर पक्षाच्या नेत्यांचा आग्रह असल्याची माहिती मलाच दिली जाते, असे पवार म्हणाले.
‘आराखडय़ाचे सादरीकरण करा’
जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ाबाबत आपल्या हातात काही नाही. मुख्यमंत्रीच त्या आराखडय़ाबाबत आता निर्णय घेणार आहेत. राज्य शासन आराखडय़ावर हरकती सूचना घेईल. त्यावेळी सूचना मांडता येतील. शासन नियुक्त समितीने केलेल्या आराखडय़ाचे आयुक्तांनी लोकप्रतिनिधींपुढे सादरीकरण करावे. शहरासाठी तयार झालेला हा विकास आराखडा काय आहे, हे शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून माहीत करून घेण्याचा तुमचा अधिकार आहे. आमदार आणि खासदारांनाही आराखडा सादरीकरणाला बोलवा, अशीही सूचना पवार यांनी केली.
महापालिका अंदाजपत्रकातील नगरसेवकांच्या यादीतील कामे होत नसल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी बैठकीत केली. त्यावर आयुक्त कुणाल कुमार यांनीच ही कामे न करण्यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे, याकडे पवार यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर पक्षनेत्यांशी चर्चा न करता आयुक्त असा निर्णय कसा घेऊ शकतात, असा प्रश्न पवार यांनी केला.
सर्वसाधारण सभेचे कामकाज व्यवस्थित होत नाही. राष्ट्रवादीच्या पक्षबैठकीत एखाद्या विषयावर एक भूमिका असते आणि प्रत्यक्ष सभेत वेगळीच पक्षाकडून भूमिका घेतली जाते, अशी तक्रार अनेक नगरसेवकांनी पवार यांच्याकडे केली. त्यावर पक्षातील काही  नगरसेवकच पक्षाला अडचण निर्माण होईल अशी भूमिका घेतात, असे सभागृहनेता शंकर केमसे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा