पुणे : पुणे पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘वरचष्मा‘ राहिला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची या बैठकीस उपस्थिती होती. मात्र, बैठकीवर दादांचा प्रभाव दिसून आला. पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दादांची पकड असल्याची चर्चा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होती. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे पवार यांनी बैठकीत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे पोलिसांकडून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते. मंडळांचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> पुणे : गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री १२ पर्यंत मेट्रो धावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

गणेशोत्सवात वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. गणेश मूर्तीच्या उंचीवर सरकारने मर्यादा घातलेली नाही. मूर्ती विसर्जन करताना प्रदूषण होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे. गणेश मूर्ती संकलनात पावित्र्य जपून प्रशासनाने भाविकांच्या भावना विचारात घ्याव्यात.उत्सव सुरू होण्यापूर्वी दोन्ही महापालिकांनी गटारांची सफाई करुन दुरुस्ती करावी. मिरवणूक मार्गावरील खड्डेही लवकर बुजवावेत, अशी सूचना पवार यांनी केली. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. हवामान खात्याने पुरेसा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे, असे पवार यांनी बैठकीत नमूद केले.

हेही वाचा >>> “आज मधूनच हिंदीत का बोलत आहात?” अजित पवारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांना हसू आवरेना; पण पुढच्याच क्षणी…

परवाना पाच वर्षांसाठी

मंडळांना पोलिसांकडून परवाना देण्यात येतो. या परवान्याची मुदत पाच वर्षांसाठी आहे. मंडळांकडून कमानीसाठी कर आकारु नका. उत्सवाची नियमावली मंडळांनीच ठरवली पाहिजे. शास्त्राप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपूर्वीच विसर्जन झाले पाहिजे. मंडळांनी विसर्जन मिरवणूक आटोपण्यासाठी पुढाकार घ्यावा. गर्दी आणि घातपात टाळण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी उत्सवकाळात निरीक्षण मनोरे उभे करावेत, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली.

२३०० मंडळांना परवाना

२३०० मंडळांना पाच वर्षांची परवाना देण्यात आला आहे. मंडळांनी पुन्हा पालिका आणि पोलिसांकडे परवान्यासाठी जाण्याची गरज नाही. शहरात विविध ठिकाणे वाहनतळ सुरू करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. वाहतूक नियमन, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत नियोजन करण्यात आले असून उत्सव काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar and chandrakant patil in pune ganeshotsav mandal meeting pune print news rbk 25 ysh