पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भावनिक मुद्द्यावर फिरणार असल्याचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच्या सभेत स्पष्ट झाले आहे. ‘सुप्रियाच्या विरोधात उमेदवार देणे ही चूक होती. मी ती चूक मागे केली. पण, आता चूक कोणी केली? आई सांगते, माझ्या दादाच्या विरोधात कोणाला उभे करू नका. तुटायला वेळ लागत नाही,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. तर, ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती काही मर्यादित लोकांनाच असेल,’ असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

बारामती विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते, अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार यांचा अर्ज दाखल करताना ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची सभा झाली. त्या वेळी बारामतीकरांना पुन्हा भावनिक साद घालून लोकसभेप्रमाणेच ही निवडणूकही भावनिक मुद्द्यावरच फिरणार असल्याचे दिसले.

हेही वाचा : ‘कॅप्सूल एंडोस्कोपी’द्वारे गंभीर आजाराचे अचूक निदान! ७३ वर्षीय वृद्धाचे वाचले प्राण;  जाणून घ्या अत्याधुनिक प्रक्रिया…

‘लोकसभेला माझे चुकले. सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती. बारामतीच्या लोकांनी सुप्रियाला मतदान केले. लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला दादा, अशीच बारामतीकरांची इच्छा होती. बारामतीमधूनच निवडणूक लढवावी, यासाठी मला खूप आग्रह करण्यात आला. त्यामुळे बारामतीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘युगेंद्रच्या रुपाने तरुण उमेदवार दिला आहे. उच्चशिक्षित असलेले युगेंद्र यांना प्रशासन आणि व्यवसायातील माहिती आहे. साखर आणि ऊस शेतीचे ते जाणकर आहेत. बारामतीकर या युवा नेतृत्वाचा निश्चितच स्वीकार करतील. सन १९६५ पासून मी आजवर इतक्यांदा उभा राहिलो. सुरुवातीला काही निवडणुकांना मी इथे प्रचाराकरिता येत होतो. नंतर तर तीही जबाबदारी बारामतीकरांनीच घेतली. या निवडणुकीतही बारामतीकर युगेंद्र पवार यांना विजयी करतील,’ असे पवार म्हणाले.

हेही वाचा : गटारावर फटाके फोडताना स्फोट झाल्याने दोन मुले जखमी, सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना

बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती काही मर्यादित लोकांनाच असेल. बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे.

शरद पवार

प्रत्येकाने आपापल्या गावात जा, घर सांभाळा. माझे घर नीट नाही, म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगतो आहे. तुटायला वेळ लागत नाही.

अजित पवार