उपमुख्यमंत्री अजित पवार विकास कामांमधील गुणवत्तेबाबत आग्रही असल्याचं नेहमीच दिसतं. असाच अनुभव पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हिलियन इमारत, अद्यावत सिंथेटिक ट्रॅक व इनडोअर हॉल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात आला. हॉलच्या सिलिंगच्या उंचीत त्रुटी दिसताच अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. तसेच आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काय काम केलं अशी विचारणा केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या इमारतीचं उद्घाटन करताना अजित पवार यांच्यासोबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी केवळ उद्घाटनच केलं नाही, तर त्या इमारतीची बारकाईने पाहणी देखील केली. यावेळी एका ठिकाणी हॉलच्या सिलिंगच्या उंचीत फरक दिसल्यानंतर अजित पवारांनी तात्काळ तो अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. आर्किटेक्चरला याबाबत विचारणाही केली.
व्हिडीओ पाहा :
अजित पवार यांनी सिलिंगमधील दोषाबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली यावर त्यांनी अंजली भागवत यांनी तशा सूचना केल्याचं सांगितलं. यावर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. अंजली भागवतने तुम्हाला चांगलीच सूचना केली. मात्र, तुम्ही ती उंची चुकीची केली त्याबाबत मी सांगत आहे. काहीही कारणं सांगतात, असं म्हणत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
हेही वाचा : रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यावरून अजित पवार संतापले; पुणेकरांना इशारा देत म्हणाले…
यावेळी अजित पवार यांनी या संकुलातील रायफल शुटिंगचाही आनंद घेतला. शुटिंग दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना बारकाईने ऐकत त्यांनी निशाणा साधला. शिवाय लेझर रायफलचाही वापर करून पाहिला.