पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं. पुण्यामध्ये वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोयता गँग सक्रिय आहे. अशा आरोपींना मकोका लावा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो. असा प्रश्न यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमीपूजनाप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांच्या समोरच अजित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारी बाबत भाष्य करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
अजित पवार म्हणाले, बिबवेवाडीत काही वाहन फोडली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा आरोपींचा मकोका लावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगतो आहे. का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. आरोपींची धिंड काढा. कोण छोट्या बापाचा नाही. कोण मोठ्या बापाचा नाही. इथं पुणे सिपी पाहिजे होते. त्यांनाही मी ऐकवलं असतं. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना फैलावर घेतलं.