उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील तळजाई टेकडी येथील वन उद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि उद्घाटनं केली. यानंतर केलेल्या भाषणात अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. प्रसार माध्यमांशी संवादात साधताना पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार भडकल्याचं पाहायला मिळालं. “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात” असं उत्तर देत त्यांनी संभाजीराजेंच्या उपोषणावर बोलणं टाळलं. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.

शिवीगाळ करणाऱ्या नेत्यांना अजित पवारांकडून थांबण्याचं आवाहन

अजित पवार यांनी सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात होत असलेल्या शिवीगाळीवरही भाष्य केले. अजित पवार म्हणाले, “मी कितीदा सांगितले की, दोघांनी तारतम्य ठेवले पाहिजे. आमच्या बद्दल देखील काही वाचळवीर चालेल आहे ना, त्यावर मी अवाक्षर देखील बोललो का? आपलं काम भलं आणि आपण भलं. प्रत्येकाची कामाची पद्धत आहे. माझं आज पण आवाहन आहे की, दोन्ही बाजूने थांबलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. ही आपली संस्कृती नाही. हे आपल्याला शोभणारं नाही.”

“युक्रेनमधून २४० विद्यार्थी मुंबईत परत येतील”

“रशियाकडून युक्रेनवर हल्ला झाला आहे. त्यामध्ये आपल्या येथील विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यावर ते म्हणाले की, प्रत्येक देशाने पुढे जावे, पण युद्ध करुन कोणी पुढे जाऊ नये. पण आज तेथील परिस्थिती लक्षात घेता, तेथून विद्यार्थी देशात आणि राज्यात आणण्याच्या दृष्टीने संवाद साधला जात आहे. आज जवळपास ३२ विद्यार्थी दिल्लीला येत असून आज दुपारी मुंबईला देखील २४० विद्यार्थी परत येतील,” असं त्यांनी सांगितलं.   

हेही वाचा : युक्रेनमध्ये अडकली लोणावळ्याची मोनिका; लेकीच्या चिंतेत आई वडिलांनी देव ठेवले पाण्यात

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपाकडून सरकार पाडण्याच्या दाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. सरकारला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. “गेल्या सव्वा दोन वर्षापासून भाजपाकडून ही वक्तव्ये केली जात आहे. परंतु अजून सरकार पडलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली, तेव्हापासून भाजपाकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. जोपर्यंत १४५ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तीन पक्ष एकत्र आहे, तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,” असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader