पिंपरी : अवकाळी पावसाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चाकणमधील सभेला फटका बसला. पावसामुळे सभेला आलेले नागरिक परत गेले. पण, पावसातही डोक्यावर खुर्च्या घेऊन थांबलेल्या नागरिकांसमोर पवार यांनी भाषण केले. गेल्या वेळी डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन चूक केली. मला माफ करा, असेही ते म्हणाले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचाराची सांगता पवार यांच्या सभेने चाकण येथे झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिलाध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार दिलीप मोहिते, अमोल मिटकरी या वेळी उपस्थित होते. चाकण परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिक सभेला येऊ शकले नाहीत. पावसामुळे अनेक जण परत गेले.
हेही वाचा >>>“खरे गद्दार श्रीरंग बारणे; दोन वेळेस ज्या पक्षाने खासदार बनवले त्याला…”, संजोग वाघेरेंची टीका
पवार म्हणाले, की छत्रपती संभाजी महाराज, हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक अजित पवार यांनी का केले नाही असे विरोधक म्हणतात. मग, काही जण चार-चार वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्याही काळात स्मारक का झाले नाही, त्यांना दोष का देत नाहीत? मी खपवून घेणार नाही. सरळ आहे, तोपर्यंत ठीक; वाकड्यात शिरलो, तर बंदोबस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना दिला.
प्रत्येकाचा आदर करतो. चांगले असाल म्हणूनच निवडून आणले. पण, तुम्ही मतदारसंघातील लोकांकडे पाठ फिरविली. खेडमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना एकमेकांविरोधात लढलो आहोत. गावचे राजकारण येथे आणू नका. भांड्याला भांडे लागले असेल, पण ताणून धरू नका. झाले गेले गंगेला मिळाले. देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेड तालुक्यातून मताधिक्य दिले पाहिजे. दिवसा, रात्री घड्याळाचेच काम करावे. गडबड करू नका, असेही पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.