पुणे : राज्याला पैलवानांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र कुस्ती महासंघातील वादाचे पडसाद गल्ली ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळतात. हे वाद आपल्याला मिटवायचे आहेत. त्यासाठीच मला केवळ बारामतीच नव्हे, तर जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी पैलवानांची मदत हवी आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे केले.
वैयक्तिक स्वार्थासाठी पैलवानांना मी येथे बोलाविलेले नाही. मात्र महायुतीला पैलवानांच्या मदतीची आवश्यकता आहे. कोणत्याही खेळाडूला कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल; तसेच येत्या काळात खेळाडूंना योग्य प्रकारे मदत केली जाईल, असा ‘खुराक’ मल्लांना देतानाच लोकसभेच्या निवडणुकीत मल्लांनी महायुतीच्या बाजूने दंड थोपटावेत, असे स्पष्ट केले.
हेही वाचा >>>मी काही स्वार्थासाठी बारामती, बारामती करायला आलो नाही : अजित पवार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पैलवान आणि वस्तादांचा मेळावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. पैलवानांसह सर्वच घटकांच्या सहकार्याने सरकार चालविले जाते. पैलवानांचे प्रतिनिधित्वही लोकसभेत असावे, यासाठी पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे, असे पवार यांनी सांगितले.ते म्हणाले, की जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे. केवळ बारामतीसाठी मदत नको आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने कुस्तीचा वारसा सर्वांना माहिती आहे. कुस्ती महासंघातील वादाचे पडसाद कायम राज्यात उमटतात. गल्ली ते दिल्ली असे वाद होतात. कुस्ती महासंघाशी माझा गेल्या अनेक वर्षांपासून संपर्क आहे.
पैलवानांचे प्रतिनिधित्व लोकसभेत असावे अशी महायुतीची भावना आहे. त्यांच्या प्रश्नांची निश्चितच मला माहिती आहे. येत्या काळात कोणत्याही खेळाडूला अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. खेळाडूंना हवी ती मदतही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.