पुणे : ‘शहरात वाहतुकीचा प्रश्न बिकट होत असून, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी कात्रज ते येरवडा हा भुयारी मार्ग महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन मार्गिका करण्याचे नियोजन असून, मेट्रोसाठी त्याच्या बाजूने अजून एक मार्ग तयार करता येईल का, याचा अभ्यास केला जात आहे. पुढील पाच वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे,’ असे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवानिमित्त अजित पवार यांनी पुणे महापालिकेला भेट देऊन पुणेकरांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘पुणे शहराचा विस्तार होत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. भुयारी मार्ग यावर उपाय आहे. तो करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांतील नागरिकांनादेखील या रस्त्याचा उपयोग करता यावा, यासाठी सुरुवातीला केवळ दोन ठिकाणी बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला जाणार होता. मात्र, आता यामध्ये वाढ करावी लागेल.’
‘भुयारी मार्ग तयार करताना अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात असल्याने त्याचा शहरातील दैनंदिन कामांवर काहीही परिणाम होणार नाही. एका वेळी दोन्ही बाजूंनी काम सुरू करून हे काम मार्गी लावता येईल. या रस्त्याचे काम कमी वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी चार ठिकाणांवरून कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी तीनपदरी मार्ग केले जाणार आहेत. तसेच, याच्या बाजूनेच मेट्रो प्रकल्पाचा चौथा मार्ग करता येईल का, याचादेखील अभ्यास केला जात आहे,’ असे पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचा विस्तार अधिक होणार असून, २०५४ पर्यंत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या पुण्यापेक्षा अधिक असेल. या दोन्ही शहरांतील नागरिकांच्या पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन या गरजा भागविण्यासाठी आतापासून नियोजन करावे लागणार आहे. मुळशी धरणातील पाणी पिण्यासाठी वापरण्यास मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे.’
‘महापालिका निवडणुकांसाठी प्रयत्नशील’
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकींचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील देऊन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. इतर मागासवर्गीयांसह (ओबीसी) सर्व घटकांना आरक्षण देऊन या निवडणुका होण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असे अजित पवार यांनी सांगितले.
‘धस-मुंडे भेटीत गैर काय?’
‘आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची आजारी असल्याने भेट घेतली. माणुसकीच्या नात्याने हे केले असेल, तर त्यात गैर नाही,’ असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, फडणवीस आणि शिंदे यांच्यात कोणतेही शीतयुद्ध सुरू नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. ‘या बातम्या धादांत खोट्या आहेत,’ असे ते म्हणाले.