पुणे : जिल्ह्याचा दादा कोण यावरून चंद्रकांत पाटील आणि उपमु़ख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू असतानाच अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याने पवार हेच जिल्ह्याचे दादा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा नियोजन समितीची दोन दिवसानंतर होणारी बैठक आता अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. वित्तमंत्री ही असलेले अजित पवार महायुतीतील शिवसेना आणि भाजप आमदारांना न्याय देणार का, हे येत्या काही दिवसात कळणार आहे. राज्यातील बदलत्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर ते पालकमंत्री होतील, अशी चर्चा सुरू झाली होती.
हेही वाचा >>> अजित पवारांच्या मनासारखे झाले; भुजबळ, तटकरे यांची इच्छापूर्ती नाही
विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी कुरघोडी करण्यास सुरूवात केली होती. विविध विभागांच्या बैठका घेत त्यांनी जिल्ह्यावर पकड मिळवली होती. पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर केलेला निधी त्यांनी रोखला होता. त्याबाबतची तक्रार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावरून या दोघातील वाद रंगला होता. मात्र आता अजित पवारच जिल्ह्याचे कारभारी झाल्याने जिल्ह्यातील राजकारण ही बदलण्याची शक्यता आहे.