पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दोनवेळा भाजपमध्ये जातो असे वातावरण निर्माण केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली. ते दोन्हीवेळा बोलले आणि त्यांनी दोन्हीवेळा घुमजाव केले. देशभरात उरलेले सर्वजण घाबरत असले तरी अजित पवारांनी या दोघांनाही फसवले, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. कोणाला कधी, कुठे मुख्यमंत्रिपद चिकटेल त्यावर अजित पवार भाजपमध्ये जातील की नाही हे अवलंबून राहील, असेही ते म्हणाले.
पिंपरीत वडार समाजाच्या मेळाव्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारणातील चोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडत आहेत. पण, त्यांचे पकडणे मी गैर मानतो. कारण, पकडल्यावर ती प्रकरणे पूर्णत्वाकडे जात नाहीत. तीन ते चार वर्षे कारागृहात ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. हे मानसिकतेवर आघात करण्याचे धोरण आहे. कर्नाटक, केंद्रातील सत्ता गेल्यास नरेंद्र मोदीही तुरुंगात जाऊ शकतात. जे काही पेरलेले असते, तेच उगवते. त्यामुळे मोदी यांनी जे पेरले आहे, तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल अशी परिस्थिती मला दिसते, असे आंबेडकर म्हणाले.
पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्यावर तत्काळ अटक होते. पण, गुन्हा दाखल होऊन अद्यापही भाजप खासदार, कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली नाही. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आता तुमचा प्रश्न मिटला असे न्यायाधीशांनी म्हणणे चुकीचे आहे. पोस्कोचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला कधी पकडणार हे न्यायालयाने विचारले पाहिजे. ‘केरला स्टोरी’ चित्रपटामध्ये घेण्यासारखे काही नसणार आहे. तो प्रसिद्धीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. मी आपला साधा कार्यकर्ता असून कार्यकर्ता म्हणूनच मी आनंदी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही, असेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.