पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०२९ ला मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तीन असलेल्या विधानसभा मतदारसंघात वाढ होईल. शहरात पाच विधानसभा मतदारसंघ होतील. चिंचवडचे दोन मतदारसंघ होतील, असा दावा उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी केला.
पिंपरीत बोलताना अजित पवार म्हणाले, भविष्यात पिंपरी चिंचवड शहरात पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे ठोकरवाडी आणि मुळशीतील धरणातून पाणी शहरासाठी पाणी आणण्यात येणार आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पुणे मेट्रो निगडीवरुन वाकड आणि चाकण पर्यंत नेण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून वर्तुळाकार मार्ग (रिंगरोड)चे कामे सुरू आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही रिंगरोडचे काम हाती घेतले जाणार आहे. ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना मोबदला देण्यात येणार असल्याचे’ सांगून पवार म्हणाले, ‘राज्यात उष्णता वाढली आहे.
काही लोकांचा उष्म घातामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील धरणातील पाण्यात घट होत आहे. याकडे सरकारचे लक्ष आहे. सद्यस्थितीत धरणातील पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेल यासाठी प्रयत्न केला जात आहे. शहरात उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. उद्योगाबाबत नवीन धोरण आणले जाणार आहे. शहरातील अनेक कारखाने बाहेर गेले आहेत. कोणत्या गोष्टीला परवानगी दिल्यानंतर रोजगार निर्माण होईल, याचा विचार करून धोरण तयार केले जात आहे. ते लवकरच जाहीर होईल’, असेही त्यांनी सांगितले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला. कधीकधी आरोप झाल्यानंतरही राजीनामा द्यावा लागतो. चौकशी अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून रुग्णालयावरील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.