पुणे : टँकरवाल्यांचा धंदा चालविण्यासाठी खराडी, चंदननगर भागातील नागरिकांना जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्याचा उद्योग या भागातील ‘माननीयांनी’ केला. मात्र आता खूप झाले, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांना साथ द्या, या भागातील टँकरमाफियांना हद्दपार करतो, हे झाले नाही, तर पुन्हा तुमच्याकडे मते मागायला येणार नाही,’ अशी घोषणाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडगाव शेरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदननगर भागात जाहीर सभा घेतली. या वेळी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी आमदार बापू पठारे यांच्यावर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला पालिकेत स्थायी समिती अध्यक्षपद दिले. आमदार केले. त्यांनी पत्नीला, पुतण्याला नगसेवक केले. ३० वर्षे त्यांच्या घरात सत्ता असतानाही या भागातील पाणी प्रश्न सोडविला नाही. दोन पैसे कमाविण्याासाठी नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे आणि टँकरमाफियांना सहकार्य करणे, हे खपवून घेणार नाही.’ महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभे रहा, या भागातील टँकरमाफिया हद्दपार करून दाखवितो, हा माझा शब्द आहे.

हेही वाचा…धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका

u

पाच वर्षांपूर्वी हे महाशय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माझ्याबरोबर सकाळपासून संध्याकाळपर्यंत होते. रात्री अचानक ‘वर्षा’वर जाऊन पोहचले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मग ही गद्दारी नाही का, असा सवालही त्यांनी केला. जे घरच्या सुनेला न्याय देऊ शकत नाहीत, ते मतदारसंघातील महिलांना काय न्याय देणार, अशी टीकाही केली. वडगाव शेरी मतदारसंघात दादागिरी, गुंडगिरी, दहशत खपवून घेणार नाही. बेकायदा पब, बार यांच्याच मालकीच्या इमारतींमध्ये सुरू असल्यााचा घणाघात पवार यांनी केला.

हेही वाचा…पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार

‘त्या’ प्रकरणाशी आमदार टिंगरेंचा दुरान्वये संबंध नव्हता

‘कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांना विनाकारण बदनाम करण्यात आले. या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांकडून घेतली. त्यामध्ये त्यांचा दुरान्वये संबंध नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली. महायुतीचे सरकार निवडून द्या, पुढची पाच वर्षे सुरू केलेल्या सर्व योजना सुरूच राहतील याची हमी देतो,’ असेही पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar claimed area honorables deprived kharadi chandannagar of water for tanker business pune print news ccm 82 sud 02