पुणे : काँग्रेसने कितीही दावा केला तरी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद जास्त आहे. गेल्या काही वर्षात काँग्रेसला पुणे लोकसभेची जागा जिंकता आलेली नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभेवर दावा केला. मात्र आम्ही कोणीही काही बोलून उपयोग नाही. जागेबाबतचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांकडून होईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> शहरी भागात देशी खेळांचे अस्तित्व टिकवणे गरजेचे -अजित पवार
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी शनिवारी पोटनिवडणूक होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात जास्त ताकद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच ही जागा लढवेल, असे अजित पवार यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले असून काँग्रेसच्या स्थानिक तसेच वरिष्ठ नेत्यांनीही पुण्याची जागा काँग्रेसचीच आहे, असे स्पष्ट केले आहे. पुण्यात काँग्रेसची ताकद जास्त असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रविवारी पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचले.
हेही वाचा >>> पुणे: टेकड्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्या; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सल्ला
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेस पेक्षा जास्त आहे. कोणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिले पाहिजेत. तसेच काँग्रेसला पडलेली मतेही विचारात घ्यावी लागणार आहेत. एखाद्या मतदारसंघात जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथे जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरकडे जरी अशीच उलट परिस्थिती असेल. तेव्हाही असेच घडले पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी, असे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात कोणी काही बोलून उपयोग नाही. पुण्याची जागा कोण लढवणार, याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.