पिंपरी : ‘कथित सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या नस्तीवर (फाइल) तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी करून केसाने गळा कापल्याच्या विधानाचा निवडणुकीशी काही संबंध नाही. माझ्या दृष्टीने ताे विषय संपला आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे वाटले, ते मी बोललो,’ असे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी चिंचवडमध्ये स्पष्ट केले.

‘केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. पुढे चौकशीसाठी एक नस्ती तयार केली गेली. ती गृह खात्याकडे गेल्यानंतर आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. त्यांनी केसाने गळा कापण्याचे काम केले,’ असे विधान अजित पवार यांनी तासगावमध्ये केले होते. त्याचे राजकीय पडसाद उमटले. त्यावर अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘जे झाले ते झाले. ते परत उकरून काढायचे नाही. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे वाटले, ते मी बाेललाे. याचा निवडणुकीशी काही संबंध नाही. माझ्या दृष्टीने ताे विषय संपला आहे. आगामी महापालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहाेत.

हेही वाचा >>>गिग कामगारांनी साजरी केली काळी दिवाळी! जाणून घ्या कारणे…

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला यश मिळण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. हे शहर २५ वर्षे आमच्या विचारांबराेबर ठेवले हाेते. शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. शहराला आणखी विकसित करण्याचा प्रयत्न असणार आहे.’ दिवाळीला पवार कुटुंब एकत्र दिसेल का, याबाबत विचारले असता, ‘आपल्याला दिसेलच,’ असे म्हणत अजित पवार यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

‘बंडखोरांनी ऐकले नाही, तर कठोर कारवाई’

‘मावळ’मध्ये बापू भेगडे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात बंड केल्याने आणि त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांनी पाठिंबा दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्याबाबत विचारले असता, अजित पवार म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत सविस्तर चर्चा झाली आहे. फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या प्रचार सभेला येणार आहेत. भाजपकडून पत्रक प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. महायुतीमधील कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. ऐकले नाही, तर कठाेर कारवाई केली जाईल.’