शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यापासून दोन दिवस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पण, पक्षनेते, कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीची निर्णय मागे घेत असल्याची घोषणा शुक्रवारी (५ मे) शरद पवारांनी केली. मात्र, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. यावर प्रश्न विचारताच अजित पवार चिडल्याचे पाहायला मिळाले. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. मी स्वत: ट्वीट करत प्रेसनोट काढली आहे. कालच शरद पवारांनी सांगितले, ‘माझा आणि पत्रकारांचा जास्त संबंध येत नाही’ कारण, मी कामाचा माणूस आहे.”

हेही वाचा : “हॅलो शरद पवार बोलतोय!” एक फोन अन् धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची सुटका

कायमच तुमच्याबद्दल संभ्रमाचे वातावरण का निर्माण केले जाते? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी मिश्कीलपणे उत्तर देत म्हटले, “ते तुम्ही प्रश्न विचारता, म्हणून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जाते. आमच्यावर अतिशय प्रेम करणारे जे लोक आहेत, ते माझ्याबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार करतात.”

हेही वाचा : “५० खोके वाले आज ४० टक्क्यांसाठी कर्नाटकात गेले खरं, पण..”; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्र!

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित का होता? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार पत्रकारावर चिडले. “ए… त्याबद्दल शरद पवारांनी सांगितलं आहे ना… पुन्हा, पुन्हा काय रे तेच ते… प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पी. सी. चाको आणि केरळचे आमदार तिथे उपस्थित होते. तसेच, पत्रकार परिषदेत चार-पाच खुर्च्या असतात. त्यामुळे शरद पवारांनी येऊ नका सांगितलं होतं,” अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी दिली आहे.

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “आपले काही विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे. त्यांनी केंद्रातील किंवा मणिपूरमधील लोकांना बोलावं आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणावं.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar clarification why not attend sharad pawar press conferencer in back retirement ncp chief post ssa