खासदार व्हायचं असल्यानेच त्यांनी घेतला हा निर्णय
अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असे पिंपरी- चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सोमवारी मातोश्रीवर संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी पक्षातील कुठल्याही स्थानिक नेत्यावर किंवा शरद पवार, अजित पवार यांच्यावर नाराज नसून खासदार व्हायचं असल्यानेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप पक्ष प्रवेश केला नसला तरी येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेणार असल्याचं संजोग वाघेरे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना म्हटल आहे.
हेही वाचा >>> पिंपरी : पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केल्याच्या रागातून सोसायटीतील वाहनांची तोडफोड
२०१४ पासून संजोग वाघेरे हे लोकसभेची तयारी करत आहेत. मात्र, पक्ष संधी देत नसल्याने त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा जवळपास निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी संजोग वाघेरे म्हणाले, मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो. माझ्या मताबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक आहे. माझी ही भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये पक्ष प्रवेशा बाबत मी निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्ष झालं मी काम करत आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर मी नाराज नाही. स्थानिक नेतृत्वावर देखील माझी कोणावर नाराजी नाही. खासदार व्हायची माझी इच्छा आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघावर आणखी पाच वर्षी मागासवर्गीय आरक्षण राहणार आहे. गेल्या २०१४ पासून मी मावळ लोकसभेची तयारी करत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला सुटलेला आहे. म्हणून शिवसेनेची दार ठोठावलेली आहेत. पक्षप्रवेशाबाबत दोन- तीन दिवसात निर्णय घेणार आहे अस वाघेरे म्हणाले.