राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून अनेक हेवेदावे सुरू आहेत. कधी देवेंद्र फडणवीसांचा, कधी अजित पवारांचा, कधी सुप्रिया सुळे, तर कधी जयंत पाटलांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करत बॅनरबाजी केली जाते. सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. याबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (२४ सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “आता कुणीच शिल्लक राहणार नाही. सगळेच आपआपले बोर्ड लावतील. माझे बोर्ड लावले तेव्हा मी मागेच सांगितले की, असे बोर्ड लावून काहीच होत नाही. केवळ कार्यकर्त्याला समाधान मिळतं.”
“तोपर्यंत हे दिवा स्वप्नच राहतं”
“कुणी कुणाचे बोर्ड लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. असं असलं तरी जोपर्यंत एखादी व्यक्ती १४५ चा जादुई आकडा गाठू शकत नाही. तोपर्यंत हे दिवा स्वप्नच राहतं,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
“तुमचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आगामी काळात पूर्ण होईल का?”
यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना “तुमचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आगामी काळात पूर्ण होईल का?”, असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “माझं काम सुरू आहे. १९९१ मध्ये या शहराने मला खासदार केलं तेव्हापासून मी काम करतो आहे. मला कामाची आवड आहे. मी कामासाठी वेळ देतो. सकाळी लवकर माझ्या कामाची सुरुवात होते. हे सर्वांना माहिती आहे.”
हेही वाचा : अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी गैरहजर का? अजित पवार स्पष्टच म्हणाले, “मी त्यांना…”
“सध्या वाचाळवीरांची संख्याच वाढली आहे”
“हा असं म्हटला, तो तसा म्हटला यावर मला बोलायचं नाही. सध्या वाचाळवीरांची संख्याच वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि परंपराही नाही. आपण आपलं काम करत रहायचं,” असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिलं.