पुणे : आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे, हे करोना कालावधीत दिसून आले. वैद्यकीय सुसज्जतेची गरज याकाळात अधोरेखीत झाली. त्यातूनच वारजे येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची कल्पना पुढे आली. या दरम्यान, महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आली. मात्र विचारपूर्वक रुग्णालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये मी आणि चंद्रकांत दादा यांनी निवडून आणलेल्या नगरसेवकांची आग्रही भूमिका होती. त्यामुळे दोन्ही दादांनीच या भागातील नगरसेवक निवडून आणले आहेत, हे कोणी विसरू नका, असा सूचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
वारजे येथील ३७५ खाटांच्या मल्टिस्पेशालिटी हॅस्पिटलचे भूमीपूजन अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्यासाठी पाठपुरावा केल्याचे नमूद करत त्यांचा नामोल्लेख केला होता. हा धागा पकडत मीच नगरसेवक निवडून आणले हे कोणी विसरू नका, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे : शहरात कारवाईची अफवा पसरवणाऱ्या १२०० जणांवर गुन्हा
सहा सात वर्षे काय काम केले, याचे फलक लागलेले मी पहात आहेत. मात्र या भागातील नगरसेवकांना मीच निवडून आणले आहे. भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते चंद्रकांत पाटील यांनी निवडून आणले आहेत. त्यामुळे दोन्ही दादांनीच नगरसेवक निवडून आणले आहेत, हे कोणी विसरू नका. दोन वर्षांपासून निवडणुका थांबल्या आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यासंदर्भात राज्य सरकार प्रयत्नशील आहे. निवडणूक व्हावी, हीच महायुतीची भूमिका आहे, असे पवार यांनी सांगितले.