राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली. तसेच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नोटीसला उत्तर देणं हे नोटीस आलेल्या लोकांचं काम असतं. त्यामुळे जयंत पाटील त्या नोटीसला उत्तर देतील,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१२ मे) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “माझा आणि जयंत पाटील यांचा संपर्क झाला नाही. आम्ही फलटणला अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला एकत्र होतो. तेथे आम्ही राजराजेंकडे एकत्र जेवणही केलं. तोपर्यंत त्यांना ईडीची नोटीस आलेली नव्हती. ईडी नोटीसबाबत मला माहिती नाही. त्याबाबत मी जयंत पाटलांकडून माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन.”

“नोटीसला उत्तर देणं हे नोटीस आलेल्या लोकांचं काम”

“मागे माझ्याशी संबंधित वेगवेगळ्या लोकांना ईडी नोटीस आली होती हे आपण पाहिलं आहे. शेवटी सीबीआय, ईडी, एनआयए, आयटी, एसीबी, सीआयडी, पोलीस या वेगवेगळ्या तपास संस्थांना चौकशीचा अधिकार आहे. त्याचा वापर करून काही लोकांना अशा नोटीस येतात. त्या नोटीसला उत्तर देणं हे नोटीस आलेल्या लोकांचं काम असतं. त्यामुळे जयंत पाटील त्या नोटीसला उत्तर देतील,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

“नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला”

दरम्यान, नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर अजित पवार म्हणाले, “प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही.”

हेही वाचा : VIDEO: “मला पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं म्हणजे…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

“..तर १६ आमदार तेव्हाच अपात्र ठरले असते”

“मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकासआघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती. या घटना घडल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली. जर त्या जागेवर मविआचे नेते असते तर त्यांनी या १६ आमदारांना तेव्हाच अपात्र ठरवलं असतं,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on ed notice to jayant patil on marriage anniversary pbs