राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आज पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी त्यांनी सचिन भोसले यांच्यावरील हल्ल्यसह अनेक विषयांवर आपले मत मांडले. “दोन्ही मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. म्हणूनच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शो घेत आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारसंघात दिसत आहेत. अनेकजण ठाण मांडून बसले आहेत”, असे अजित पवार म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्लेक्सला काडीचा अर्थ नाही

मुंबईत बॅनरबाजी सुरू असून आधी अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले होते, आता सुप्रिया सुळे यांचा  “सुप्रिया सुळे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री” असा कटआऊट लावण्यात आला. यावर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अतिउत्साही कार्यकर्ते अशा गोष्टी करतात. त्यांचा उत्साह हा ओसंडून वाहतोय, म्हणून एक झाले की दुसरा कार्यकर्ता फ्लेक्स लावत आहे. या फ्लेक्सला काडीचा अर्थ नाही. ज्या पक्षाकडे १४० चं संख्याबळ असेल त्याचा मुख्यमंत्री असतो, असे अजित पवारांनी स्पष्ट सांगितले.

हेही वाचा – लाऊड स्पीकरला रात्री १२ नंतर परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे कानावर हात, म्हणाले “हा सुप्रीम कोर्टाचा विषय….”

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि बाण चिन्हाबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. त्यावर, “१० जून १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना केली. घड्याळ चिन्ह सर्वदूर पोहोचले आहे. जनता नेतृत्वाकडे बघते. सोशल मीडिया, कार्यकर्त्यांच्या बळावर चिन्ह कमी वेळेत जास्त दूर पोहोचवता येऊ शकतो,” असे अजित पवार म्हणाले.

सचिन भोसलेंवरील हल्ल्याचा निषेध व्हायला हवा

भोसले यांच्यावर भ्याड हल्ला झाला आहे. याचा निषेध व्हायलाच हवा. लोकशाहीत महाविकास आघाडीने आणि विरोधकांनी त्यांचे काम करावे,पण गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून अशा घटना घडत असतील तर तो कलंकच आहे. अहिंसेच्या भूमिकेतून तुमचे म्हणणे मांडा. पायाखालची वाळू घसरायला लागली की अशा स्थराला माणूस पोहोचतो, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – मनसे नेते वसंत मोरे म्हणतात.. “ही आहे माझी सोशल मीडियाची पॉवर”

किती वेळा सांगू..

“मला त्या विषयी नाही बोलायचे, किती वेळा सांगू, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जसे स्वराज्यरक्षक यावर मी ठामच आहे ना”, असे पहाटेच्या शपथविधीवर विचारले असता अजित पवार यांनी रोखठोक सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on eknath shinde in chinchwad by election campaign kjp 91 ssb
Show comments