राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय बारामतीत आला. यावेळी एका सभेत बोलताना अजित पवारांनी “इतरांची जिरवायची म्हणून माझी जिरवू नका,” असं वक्तव्य केलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते मंगळवारी (२५ एप्रिल) बारामती बाजार समितीच्या प्रचार सभेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “बारामती बाजार समितीच्या निवडणुकीत काहीही करून दैदिप्यमान यश मिळवा. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी आहे. नाही तर शेवटी मतदान करू म्हणत भांडी घासून येते, जेवून येते असं म्हणू नका. वेळेआधीच मतदान करा. त्याआधीच कार्यकर्त्यांनी नियोजन करावं. मतदारांना आणण्यासाठी वाहनांची अडचण नाही.”
“त्याची जिरवायची म्हणून माझी जिरवू नका”
“कुणावर जबाबदारी टाकली, तर त्याच्यावर टाकली का? असं म्हणत त्याची जिरवायची म्हणून माझी जिरवू नका. मला विचारलं नाही ना, मग बघतोच असं करू नका. ही सामुदायिक जबाबदारी आहे. कृपा करून याची नोंद सर्वांनी घ्यावी. महिला, युवक, वडिलधाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी ही नोंद घ्यावी. कपबशी हेच चिन्ह लक्षात ठेवावं,” असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
हेही वाचा : VIDEO: “अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात”, भाजपा नेत्याचं मोठं विधान
“कुणीही रुसू नका, फुगू नका, नाराज होऊ नका”
“सगळीकडे व्यवस्थित मतदान करून घ्या, अशी माझी आग्रहाची विनंती आहे. कुणीही रुसू नका, फुगू नका, नाराज होऊ नका. खूप चांगल्या मताधिक्याने निवडून आणा. तुम्ही तुमचं काम करा, पुढील पाच वर्षे बारामती बाजार समितीचं चांगलं काम करण्याचा शब्द माझा असेल,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.