कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं ‘हिमालयात जाईन’ या वक्तव्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. “निवडणुकीच्या काळात मतदारांना खात्री पटायला, विश्वास वाटायला, त्यांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
अजित पवार म्हणाले, “मी तुम्हाला परत सांगतो हे असं म्हटले, ते तसं म्हटले, निवडणुकीच्या काळात मतदारांना खात्री पटायला, विश्वास वाटायला, त्यांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात.”
“याच्या खोलात मला जायचं नाही”
“शेवटी यश एकाला मिळतं, दुसऱ्याला अपयश हे घ्यावंच लागतं. त्याप्रमाणे आमच्या महाविकासआघाडीला यश मिळालं आहे आणि भाजपाला अपयश मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं आणि कसं सांगितलं याच्या खोलात मला जायचं नाही. त्याची चर्चाही करायची नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“ज्यावेळी पराभव होतो तेव्हा…”
“ज्यावेळी पराभव होतो तेव्हा तीन पक्षाची आघाडी होती असं म्हटलं जात आहे. तीन पक्षांची आघाडी होती याबद्दल आम्ही काही म्हणतच नाही. महाविकासआघाडीने तीन पक्षांचा मिळून उमेदवार दिला होता. निवडणुकीत एक मताने निवडून आलं काय आणि लाख मतांनी निवडून आलं काय, शेवटी त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते,” असंही मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “दादा हिमालयात जाणार असतील तर मीही…”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा खोचक टोला
“जयश्री जाधव यांच्या खांद्यावरील जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्हा लोकांकडून त्यांना सर्वोतपरी सहकार्य १०० टक्के मिळेल,” असं अजित पवार यांनी नमूद केलं.