राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले दिसले. महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तर द्यायला मी मोकळा नाही, असं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी काय म्हटलं हे त्यांनाच विचारत जा, असंही नमूद केलं.
अजित पवार म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला.”
“मी क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. आमची हीच इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीबद्दलचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय निवडणुका घेण्यातच येऊ नये. त्याही घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तशापद्धतीने आम्ही ठरावही केला. ज्या सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“ओबीसी मुद्दा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही, यात राजकारण आणू नका”
अजित पवार म्हणाले, “ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये देखील हा मुद्दा पुढे आलाय. तेही सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. इतर राज्यांमध्ये देखील अशाप्रकारचे मुद्दे येत आहेत. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे तो सगळीकडेच लागू होत असतो. त्यामुळे सर्वांनी यात कुठलंही राजकारण आणू नये.”
“महाराष्ट्राची बाजू मांडण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं नाही”
“सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं नाही. आता मध्य प्रदेशच्या वेळी प्रतिज्ञापत्रंही दिलं आणि हरिश साळवी यांच्यासारखे मोठे वकील दिले,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
व्हिडीओत काय म्हणाताना दिसतायत आव्हाड?
“ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,” असं आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत.
नक्की वाचा >> ओबीसींवर माझा फार विश्वास नाही म्हणणारे आव्हाड म्हणजे…; गोपीचंद पडळकरांनी साधला निशाणा
ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पगडा
“ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,” असं आव्हाड म्हणाले आहेत.
हा व्हिडीओ सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पोस्ट करण्यात आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.