राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापुरुषांचे विषय काढून वाद नको, अशी भूमिका घेतली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही रविवारी (२८ नोव्हेंबर) आपल्या सभेत अशीच भूमिका घेतली. यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचं ऐकलं का? अशी विचारणा केली. त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (२८ नोव्हेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “राज ठाकरेंचे विचार त्यांच्याबरोबर, माझे विचार माझ्याबरोबर आहेत. आम्ही स्पष्टपणे बोलतो. आमच्या ‘ओठात एक आणि पोटात एक’ अशी भावना कधीच नसते. हे बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणून मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी आम्ही जे बोलतो ती आमची वैयक्तिक भूमिका असते, ती पक्षाची भूमिका नसते.”
“मला जे वाटतं ते मी माध्यमांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो”
“सहसा पक्षाची भूमिका प्रवक्ते, पक्षाचे प्रांताध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करतात. परंतु, विरोधी पक्षनेता म्हणून समाजात वावरताना मला जे वाटतं ते मी माध्यमांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
“राजकीय स्थित्यंतर अशी घडली की, सततच या निवडणुका पुढे चालल्यात”
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले, “आम्ही सरकार असताना इतर मागास समाजाला आरक्षणासाठी आम्ही खटाटोप केला. आमची अपेक्षा होती की, ताबडतोब निवडणुका लागाव्यात आणि सर्वांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. परंतु नंतरच्या काळात राजकीय स्थित्यंतर अशी घडली की, सततच या निवडणुका पुढे पुढे चालल्या आहेत.”
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी भविष्य पाहिल्यावरून अजित पवारांनी कान टोचले, हसत हसत म्हणाले, “ज्योतिषाकडे जाऊन…”
“सहकार क्षेत्रातील निवडणुका झाल्याही आणि जे निवडून यायचे ते आलेही. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का लागत नाहीत? एखादा विषय न्यायव्यवस्थेच्या समोर असेल तर त्याचा अंतिम निर्णय न्यायव्यवस्थाच घेते. मात्र, सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचे लोक असोत, सर्वांनी एक निर्णय घेतला पाहिजे. फेब्रुवारी २२ ला महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका व्हायला हव्या होत्या. आता डिसेंबरमध्ये १० महिने होतील, तरी निवडणुका होत नाहीत,” अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.