खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टीकाही होत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “ज्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसलेले दिसत आहेत ते मुख्यमंत्र्यांचं घर आहे. कुणाच्या घरात कुणी कोणत्या खुर्चीवर बसावं हा शेवटी त्या घरातील अंतर्गत प्रश्न आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (२३ सप्टेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “ते मुख्यमंत्र्यांचं घर आहे. मात्र, मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर केवळ मुख्यमंत्रीच बसतात. आम्हीही ते अनेक वर्षे अनुभवत आहोत. उद्या कुणाच्या घरात कोणत्या खुर्च्या ठेवल्या आहेत, त्यावर कोणी बसावं कोणी बसू नये हा शेवटी घरातील अंतर्गत प्रश्न आहे. ती खुर्ची मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणून ठेवली गेली नसेल.”
“या गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा बेरोजगारी, महागाईकडे लक्ष द्यावं”
“घरात मुलं असतात, सुना असतात, भाऊ असतात किंवा इतर लोक असतात. या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यापेक्षा बेरोजगारी, महागाई याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला त्या गोष्टींचा विसर पडतो आहे.”
“शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्र्यांना बसण्याचा अधिकार”
अजित पवार पुढे म्हणाले, “आम्ही पालकमंत्री असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांच्या कार्यालयात बसण्याचा अधिकार असतो. हा अधिकार मंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असेल तर असतो.”
“ज्याने त्याने ज्या त्या नियमांचं पालन केलं पाहिजे”
“श्रीकांत शिंदेंबाबत नक्की काय झालं आहे याबाबत खासदार शिंदेंनी माहिती दिल्याशिवाय स्पष्टता येणार नाही. ज्याने त्याने ज्या त्या नियमांचं पालन केलं पाहिजे,” असंही पवारांनी नमूद केलं.