राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी लोकसंख्येच्या मुद्द्यावरून जोरदार टोलेबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं उदाहरण देत लोकसंख्येबाबत लोकांच्या वर्तनावर एक खंतही व्यक्त केली. ते रविवारी (३० एप्रिल) पुण्यातील मावळ येथे बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “आपल्या देशाचा जगात पहिला क्रमांक लोकसंख्येत आला आहे. त्यात आपण चीनलाही मागे टाकलं आहे. हे चीनबीन सगळे पाठीमागे गेले. लोकसंख्येत आपला पहिला क्रमांक आहे. आपण काय करतोय? मलाही वाईट वाटतं. मी ३० वर्षे या जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करतो. १९६९ मध्ये शरद पवार एका मुलीवर थांबले आणि आम्ही आपले वंशाचा दिवा वंशाचा दिवा करतोय.”

“वंशाचे दिवे काय करतात हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघतो”

“वंशाचे दिवे काय करत आहेत हे आपणच आपल्या उघड्या डोळ्याने बघतो आहे. हे गांभीर्याने घ्या. जमीन आहे तेवढीच आहे. जमीन आहे तेवढीच आहे, पाणी आहे तेवढंच आहे. त्यात पर्यावरणाचा ह्रास होत चालला आहे. मावळकरांना कधी एप्रिलमध्ये पाऊस पाहिला आहे का? आता शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, जागतिक हवामान बदलामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण, हे बदलाचे संकेत? अजित पवार म्हणाले…

“बारमाही पिकं उद्ध्वस्त होत आहेत”

“गारपीट होते आहे, वादळ सुटत आहे, पत्रे उडून जात आहेत. झाडं मोडत आहेत, अतोनात नुकसान होत आहे. बारमाही पिकं उद्ध्वस्त होत आहेत, फळबागा उद्ध्वस्त होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मावळमध्ये लागवडीखाली असलेली शेती आणि आता २०२३ मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत. या काळात रस्त्यांसाठी किती जमिनी गेल्या. सगळीकडे नागरिकरण प्रचंड सुरू आहे,” अशी काळजीही अजित पवारांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on population of india sharad pawar pbs