राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन अजित पवारांच्या नेतृत्वातील गट भाजपा-शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून कोण कोणत्या जागा लढवणार, कोणत्या जागेवर उमेदवार दिला जाणार नाही याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “आम्ही त्यावर विचार करू. जेव्हा वेळ जेईल तेव्हा त्या त्या गोष्टीचा विचार केला जाईल.”
सुनेत्रा पवार बारामतीतून लढण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान, बारामतीतून सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्याविरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयाचं पूर्ण ताकदीने स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती.
“कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे”
सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, “माझं म्हणणं आहे की , आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्लीत काय दडपशाही सुरू असते, हे संपूर्ण देश पाहतोय. पण आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळे मला वाटतं की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान केला पाहिजे.”
हेही वाचा : बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढणार? रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“भाजपा तीन वेळा माझ्या विरोधात निवडणूक लढली”
“भारतीय जनता पार्टी तीन वेळा माझ्या विरोधात निवडणूक लढली. यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचं मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे. टिकली पाहिजे. आपण अशा सर्व निर्णयांचं पूर्ण ताकदीने स्वागत केलंच पाहिजे. कुणीतरी विरोधात लढलंच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली होती.