उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं. यावेळी विद्यापीठातील विकास कामांसाठी त्यांनी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलं. अजित पवार यांनी पुणे विद्यापीठ निवडणुकीत आपल्या बायकोला बिनविरोध निवडून दिलं, पण तरीही मला विद्यापीठात येता आलं नाही, असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या मुद्द्यावरही भाष्य करत सावित्रीबाईंचा पुतळा विद्यापीठात नाही हे मनाला वेदना देत होतं, असं नमूद केलं.
अजित पवार म्हणाले, “मी मागे देखील पुण्याचा पालकमंत्री होतो. उदय सामंत यांना माझा स्वभाव माहिती आहे. त्यांना मी माझ्या पक्षाच्या युवक आघाडीचा अध्यक्ष केलं होतं. तेव्हा त्यांनी माझं काम पाहिलं आहे. काम करत असताना कुणी आपल्याला बोलावत नाही आणि आपण म्हणायचं चला चला तिकडं जाऊ, चला चला इकडं जाऊ असा माझा स्वभाव नाही. जर कुणी बोलावलं तर गेलं पाहिजे. तिथे पण मानपान काही ठेवायचं कारण नाही. तिथे सगळ्यांना मदत झाली पाहिजे.”
“सावित्रीबाईंचा पुतळा विद्यापीठात नाही हे मनाला वेदना देत होतं”
“आत्ताच्या काळात उदय सामंत यांनी मला आग्रह केला म्हणून मी विद्यापीठ परिसरात आलो. मी या ठिकाणाहून अनेकदा जात येत असतो. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवायचा होता आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी हवी होती. तसेच इतर काही कामं होती. मी पाच मिनिटात त्यांचं काम केलं. कामासाठी मला वेळ लागत नाही. सावित्रीबाई फुले यांचं या विद्यापीठाला नाव आहे आणि त्यांचाच पुतळा विद्यापीठात नाही हे मनाला वेदना देत होतं,” अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.
“विद्यापीठाच्या निवडणुकीत माझ्या बायकोला बिनविरोध निवडून दिलं, पण…”
“विद्यापीठात निवडणूक होते आणि त्यात सुदैवाने माझ्या बायकोला बिनविरोध निवडून दिलं आहे. म्हणजे माझी बायको इथं आहे आणि तरीही मला विद्यापीठात येता आलं नाही. आता काय म्हणायचं? ही माझी अवस्था आहे,” असं म्हणत अजित पवार यांनी मिश्कील टिपण्णी केली.
हेही वाचा : VIDEO: “आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काय काम केले?”, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
अजित पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
- विद्यापीठातील विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी जाहीर.
- आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही. उद्या आणखी कुणी येईल, परवा कुणी येईल, पण आम्ही आहोत तोपर्यंत कामं करत राहणार.
- येताना विद्यापीठात एका बाजूचे लाईट सुरु होते. जरा विजेची बचत करा.
- मी लावलेल्या झाडाची पाहणी अधूनमधून करणार, खतपाणी घालून उदय सामंत यांनी लावलेल्या झाडापेक्षा जास्त कसं वाढेल हे बघणार.