पुणे : रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही सुटला नसला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यांना निधी दिला आहे. विविध जिल्ह्यांसाठी एकूण २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हा वाद नक्की सुटेल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात त्यांनी फुले यांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर शनिवारी येणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार) सुनील तटकरे यांनी त्यांना भोजनासाठीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या संदर्भात पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘मुंबईत मुक्कामी असाल तेव्हा माझ्याकडे भोजनासाठी या किंवा रायगडमध्ये असाल तर सुनील तटकरे यांच्याकडे जावे, अशी विनंती मी अमित शहा यांना केली होती. त्यानुसार तटकरे यांनी शहा यांना हे निमंत्रण दिले आहे. शहा यांच्याबरोबरच माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्या भागातील मंत्री म्हणून भरत गोगावले आणि उदय सामंत यांनाही त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.’