उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतील राजकारणावर निशाणा साधला आहे. काही लोकांनी जिल्हा बँक निवडणुकीत जातीयवाद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. तसेच काही लोकांना पाहुण्यारावळ्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, असंही पवारांनी सांगत निशाणा साधला. यावेळी अजित पवार यांनी आम्ही बँक चांगली चालवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने ५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिल्याची माहितीही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “दोन महिला आणि क, ड वर्ग या निवडणुका आहेत. यात काही लोकांनी जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला, तर कुणी पाहुण्यारावळ्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. मी एकटाच नाही, तर दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आम्ही सगळेच मिळून बँक चांगली चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. शून्य टक्के व्याज दराने ५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांना दिलं जात आहे. लोकांना काम चांगलं वाटत असेन तर लोक निवडून देतील.”

“एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी…”

“आम्हाला बिनविरोध जागा मिळण्यात यश आलं. खरंतर शिरूर आणि मुळशीची अ वर्ग जागेची निवडणूक होती. हवेलीत मैत्रीपूर्ण लढत आहे. तिथू दोन्ही आमच्याच विचाराची लोक आहेत. त्या दोघांनाही मी समजाऊन सांगत होतो पण दोघंही हट्टाला पेटले होते. एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या आणि दुसरा म्हणायचा ही माझी शेवटची संधी आहे. असं म्हणून दोघेही निवडणुकीत उभे राहिले. त्यामुळे तिथं बिनविरोधसाठी मला यश आलं नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“लोक वेगवेगळ्या प्रलोभणांना बळी पडतात”

“एक आहे सामान्य निवडणुकीत सोपं जातं. कारण सर्वसामान्य लोकांना मताचा हक्क असतो. या निवडणुकीत मर्यादित लोकांना मताचा अधिकार असतो. त्यावेळी काही वेगळ्या प्रकारची प्रलोभणं दाखवली तर कधीकधी काहीजण बळी पडतात,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

“दुर्दैवाने आम्हाला बिनविरोध निवडणूक करण्यात यश आलं नाही”

अजित पवार म्हणाले, “काही लोक वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करत आहेत. मी माझ्या परीने जेवढं समजाऊन सांगता येईल तेवढं सांगितलं आहे. आम्ही संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आम्हाला यश आलं नाही. शेवटी लोकशाहीत काही लोक उभे राहतात तसे काही लोक उभे आहेत. आम्ही आमच्या विचाराची लोकं निवडून आणण्यासाठी आमच्या परीने प्रयत्न करतो आहे.”

हेही वाचा : राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका!

“हवेली आणि पुणे शहराचा, पिंपरी चिंचवडचा विचार सर्वात जास्त मतदानात दुसरा क्रमांक बारामतीचा आहे. बारामतीत अ, ब, क, ड, ई अशा वेगवेगळ्या प्रकारची जवळपास ७०० मतं आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय, आम्ही प्रयत्न केलाय. गेली ३० वर्षे आम्ही खूप चांगल्या प्रकारे बँक चालवतो. यावेळीही लोकांनी सहकार्य करावं, अशी आमची विनंती आहे,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticize caste based politics in district bank election pbs
Show comments