तंत्रज्ञानाच्या युगात आंबा खाण्याचा सल्ला देणारे बौद्धीक दिवाळखोर आहेत. तसेच पंतप्रधान बेरोजगार युवकांना भजी विकण्याचा सल्ला देत आहेत ही बाब म्हणजे त्यांची थट्टा आहे असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तुम्हाला बेरोजगारांसाठी काहीही करता आलेले नाही असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताना दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊ असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले का? असाही प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
मोदी सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकांमध्ये जनता त्यांना घरी बसवेल. जनतेचे प्रश्न असोत, महिलांचे असोत किंवा युवकांचे प्रश्न असोत कोणताही प्रश्न या सरकारला सोडवण्यात यश आलेले नाही असेही अजित पवारांनी म्हटले आहे. नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ‘जॉब फेअर’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात त्यांनी भाजपावर टीकेचे ताशेरे ओढले.
२१ व्या शतकात भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. इस्त्रो जगभरातील शेकडो देशांचे उपग्रह भारतातून प्रक्षेपित करते. तर दुसरीकडे प्रतिगामी विचाराची व्यक्ती ‘आंबा खाण्याचा’ सल्ला देते. अशा विचारवंतांची कीव येते असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. किव येते, असे म्हणत भिडे गुरुजींवर नाव न घेता टीका केली. युवकांना सल्ला देताना ते म्हणाले, बेरोजगारांनी नाउमेद न होता नैराशयातून व्यसनाधीन होऊ नये असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
अनेक सरकारी आस्थापनांमध्ये रिक्त जागांची संख्या मोठी आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये ५०० जागा रिक्त असून रयत शिक्षण संस्थेत २५०० हजार पदे रिक्त आहेत. सरकारने याबाबत धोरण निश्चित करून गुणवत्ता पात्र सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अस पवार म्हणाले