पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बेधडक स्वभासाठी ओळखले जातात. ते नेहमीच स्पष्ट बोलणारे नेते आहेत. पिंपरी- चिंचवड शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांच्यावर पहाटे उठून ते कॉन्ट्रॅक्टरला भेटतात, त्यांचा विकास केला असा आरोप करत निशाणा साधला होता. यावर आज अजित पवार यांनी थेट तुषार कामठे यांना सुनावलं असून तुझ्या बापाने मी कॉन्ट्रॅक्टर सोबत फिरतो ते पाहिलं का? काहीही बोलायचं आणि आरोप करायचे. असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. अजित पवार हे सांगवी येथे जाहीर सभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी शरद पवार गटाची शिरूर लोकसभा विजय निश्चित मेळावा घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. तेव्हा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप करत टीका केली होती. ते म्हणाले की, नेहमी अजित पवार म्हणतात पहाटे उठून कामाला लागतो. शहराचा विकास केला आहे. त्या अजित पवार यांनी केवळ ठेकेदारांचा आणि त्यांच्या विचारांच्या लोकांचा विकास केला आहे. ते पहाटे त्यांना भेटायला जायचे. पिंपरी- चिंचवड शहरात कोणी लक्ष दिलं तर त्यांना आवडत नसायचं. साधा फ्लेक्सवर फोटोवरून ते विचारणा करायचे. असं तुषार कामठे म्हणाले होते.

आणखी वाचा-पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

यावर आज अजित पवार यांनी तुषार कामठे यांना सुनावलं. अजित पवार म्हणाले, पहाटे सहा वाजता उठून विकास काम करतो. एक शहाणा दिडशहाणा तुमच्याच भागातील म्हणतो की अजित पवार कॉट्रक्टर घेऊन फिरतो. तुझ्या बापाने बघितलं होतं का? माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्टर. काहीही बडबडायचं, काही ही बोलायचं. स्वतः काही करायचं नाही. दुसरा कोणी माई का लाल सहाला उठून कामाला गेलेला पाहिला का? दाखवा बरं दुसरा लोकप्रतिनिधी सहाला उठून काम करतो ते. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला. त्याला किंमत दिली नाही पाहिजे. असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले. असे अजित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticized sharad pawar group pune city president tushar kamthe kjp 91 mrj