अजित पवारांची टीका
पिंपरी : मुख्यमंत्र्यांनी राज्याला अधोगतीकडे नेले. प्रदेशाध्यक्ष काहीही बरळू लागले असून वाचाळवीरांना पोसण्याचे काम भाजपने केले. भाजप-शिवसेनेने एकमेकांना शिव्या घातल्यानंतर आता ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत, अशी चौफेर टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीत केली.
शिरूर लोकसभेच्या तयारीसाठी झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, विलास लांडे, जगन्नाथ शेवाळे, संजोग वाघेरे, दत्ता साने आदी यावेळी उपस्थित होते. खासदार शिवाजीराव आढळराव निष्क्रिय ठरल्याची टीका मेळाव्यात सर्वच वक्तयांनी केली.
पवार म्हणाले, भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे. गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असूनही त्याचा काहीही उपयोग नाही. आतापर्यंतच्या पंतप्रधानांनी काहीच केले नाही. सगळे काही मोदींनीच केले, अशा पद्धतीने जाहिरातींचा मारा सुरू आहे. भाजप-शिवसेनेची भांडणे दिखावू होती. त्यांची युती होणारच होती. युतीमुळे २५ वर्षे शिवसेना सडली, असे विधान उद्धव ठाकरे करत होते. शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. प्रत्यक्षात गुळाला मुंगळे चिटकल्याप्रमाणे ते सत्तेला चिकटून होते. जवानांवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हाही यांची युतीची बोलणी सुरू होती. भाजपने जवानांच्या विषयातही राजकारण केले आहे.
आवाज बंद करा, नाहीतर तिकीट कापून टाकेन
डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे निर्माण झालेली विलास लांडे समर्थकांची अस्वस्थता मेळाव्यात दिसून आली. मेळाव्यात सातत्याने लांडे झिंदाबादच्या घोषणा होत होत्या. मेळाव्याची सर्व सूत्रे लांडे समर्थकांकडे होती. मैदानातील सर्वच छायाचित्रांमध्ये लांडे यांचेच फलक प्रामुख्याने होते. लांडे यांना उमेदवारी मिळावी, असाच सूर त्यांच्या समर्थकांच्या भाषणांमध्ये होता. अजित पवार भाषणाला उभे राहिल्यानंतर लांडे समर्थकांच्या घोषणा वाढल्या. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या पवारांनी नंतर मात्र, घोषणा थांबवण्याची तंबी दिली. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याचे पाहून पुन्हा आवाज काढलात तर तिकीट कापून टाकेन, असा सज्जड दम त्यांनी भरला. २००९ मध्ये लांडे उमेदवार होते. तेव्हा तुमचा आवाज कुठे गेला होता. तेव्हा दुसऱ्याला मते दिली. आता आवाज कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर लांडे समर्थकांचा आवाज बंद झाला.