पुणे : महाराष्ट्रात लाखो हेक्टर जमीन सिंचनाद्वारे ओलिताखाली आणून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखविण्याचे काम अजित पवार यांनी जलसंपदामंत्री या नात्याने केले. सिंचन विभागातील ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात अजित पवार यांना नाहक बदनाम करण्यात आले. आरोप झाले यापेक्षाही काम किती झाले हे महत्त्वाचे आहे. सिंचन क्षेत्रात अजित पवार यांनी केलेले काम मोलाचे आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… Maharashtra News Live: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!

पुरंदर पब्लिसिटीतर्फे ‘कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्राचे : अजितदादा पवार’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी खासदार अशोक मोहोळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील आणि पुरंदर पब्लिसिटीचे विजय कोलते या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा… हेल्मेट है जरुरी: गेल्या दहा महिन्यात १५७ विनाहेल्मेट दुचाकी चालकांचा अपघातात मृत्यू

पाटील म्हणाले, वेळेचे नियोजन आणि स्पष्टवक्तेपणा हे दादांचे गुण आहेत. काम होणार नसेल तर ते परखडपणे सांगतात. १९९० पासून सात निवडणुकांमध्ये मी, अजितदादा, दिलीप वळसे पाटील एकत्र काम करत आहोत. आम्ही सत्तेत असताना माझ्याकडे अर्थमंत्री आणि अजित पवारांकडे कृष्णा खोरे प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी सरकारची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. शंभर रूपये आवक असताना खर्च ११३ रुपये होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत कृष्णा खोरे प्रकल्पासाठी उद्योजक आणि गुंतवणूकदारांना आम्ही दोघांनी मिळून गुंतववणुकीसाठी प्रवृत्त केले. एकमेकांना अडथळा देण्याचे काम विलासराव देशमुख यांच्या काळात कधी झाले नाही. जलसंपदा विभागाच्या कामांसाठी त्यांनी कधी आडकाठी आणली नाही. आरोप झाले यापेक्षाही काम किती झाले, याचे श्रेय अजित पवार यांच्याकडे जाते. टीका सर्वांवर होते. पण, लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली हे महत्त्वाचे आहे. सर्वांना न्याय देणे शक्य नसते. संधी नसतानाही शरद पवार, अजितदादांना साथ देणारे अनेक जण आहेत. आपला मुख्यमंत्री असेल तर सरकार चांगले चालते. पण, तीन पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेईपर्यंत वेळ लागला. काही निर्णय तर घेता आले नाहीत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. आम्ही भाषणात शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतो. पण, त्यांचे विचार युवकांमध्ये रुजविण्यासाठी कृती सक्षमपणे केली असते तर आजची वेळ आली नसती. तळागाळातील पीडितावर भविष्यात अन्याय होऊ शकतो, असा काळ आला आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. श्रीनिवास पाटील, उल्हास पवार, अंकुश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. विजय कोलते यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा… फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट सात महिन्यांतच पार; पुणे रेल्वेकडून १४.६८ कोटी रुपयांच्या दंडाची वसुली

हा दोन संस्कृतीमध्ये फरकपश्चिम बंगालमध्ये पूल पडल्यावर त्याचे राजकारण करणारे देशाचे नेतृत्व त्यांच्याच गुजरातमध्ये पडलेल्या पुलाबाबत सोयीस्कर मौन बाळगतात. एवढेच नव्हे तर गुजरात पूल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्यामुळे त्याविषयावर राजकारण न करण्याची भूमिका राहुल गांधी घेतात. हा दोन विचारधारांमधील संस्कृतीचा फरक आहे, अशी टिप्पणी करत जयंत पाटील यांनी नामोल्लेख टाळून भाजपवर टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar defamed in allegations of crores sum of irrigation scam said by jaynt patil pune print news asj
Show comments