आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका या शिवसनेसोबत लढण्यास अनुकूल असल्याचं अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) स्पष्ट केले. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचत मिश्किल टोले लगावले आणि चौफेर फटकेबाजी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असून ते उधळल्यासारखे काहीही करत आहे, असा टोला पवारांनी लगावला. ते पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता शिबिर मेळाव्यात बोलत होते.

“भाजपावाले उधळल्यासारख काही करत आहेत”

अजित पवार म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपाची सत्ता आहे. मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार बोकाळला आहे. त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही. स्मार्ट सिटीच्या कामाचा खेळखंडोबा केला आहे. पवना धरण भरलेले असताना शहरवासीयांना दिवसाआड पाणी आहे. ही शोकांतिका आहे. भाजपावाले उधळल्यासारखे काहीही करायला लागले आहेत.”

“मला इथली अंडी पिल्लं माहिती आहेत, त्यामुळे…”

“मी आल्यानंतर व्यासपीठावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सर्वांनी काही न काही आणलं होतं. दादा बघा, असं म्हणत होते. दादाकडे का बघा तर आता निवडणूक आल्या आहेत. दादांचं लक्ष आहे का आपल्याकडे, काही जण म्हणत होते दादा चुकलं आपलं. बरं त्यांनी चुकलं म्हणून कबूल केलं, परंतु मला पण पिंपरी चिंचवड नवीन नाही. मला इथली अंडी पिल्लं माहिती आहेत. त्यामुळं कोणाला अपमानित पण करायचं नाही आणि नाउमेद पण करायचं नाही. उलट ऊर्जा द्यायची आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. म्हणून चुकीच्या कामाला विरोध झालाच पाहिजे,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

“बोटचेपे धोरण घेतलं तर नागरिकांना लक्षात येतं”

अजित पवार पुढे म्हणाले, “सगळ्यांनी गट-तट या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढा. सगळ्यांच्या कमी अधिक चुका झालेल्या आहेत. आपल्या चुकांमुळे किंमत चुकवावी लागली आहे. त्याचा फटका काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बसला आहे. प्रत्येकाचे मित्रत्वाचे संबंध असतात. परंतु ते संबंध कुठपर्यंत असावेत याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ज्या वेळेस आपण आपली भूमिका नागरिकांसमोर आक्रमकतेने मांडू त्याच वेळेस जनतेला ते समजेल. बोटचेपे धोरण घेतलं तर नागरिकांना यांचं काय चाललंय ते लक्षात येतं. मॅच फिक्सिंग चाललंय का आणखीन काही चाललं आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.”

“माझेही विरोधकांशी चांगले संबंध, पण मी कधी कोणाशी फिक्सिंग केलं नाही”

“माझ्या ३० वर्षांच्या राजकीय जीवनात माझेही विरोधकांशी संबंध चांगले होते, पण मी कधी कोणाशी फिक्सिंग केलं नाही. एकदा तिकीट वाटप झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेद्वाराचं मनापासून काम करायचं आणि त्याला निवडून आणायचं यासाठी ताकद लावायची. कधी कधी काही जण स्वत: चा उमेदवार उभा करून तू त्या वार्डात आम्हाला मदत कर तुला हा वार्डात आम्ही मदत करू असले प्रकार इथं घडतात. त्याचा फटका काम करणाऱ्या उमेदवाराला बसतो. घरातच घरभेदी असेल तर त्याचा उपयोग नाही. असल्या सवयी काढून टाका, झालं गेलं गंगेला मिळालं,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“आता तीनचा प्रभाग, कोणाला कोणाला तिकीट मिळणार?”

अजित पवार म्हणाले, “आगामी निवडणुकांबाबतीत महाविकास आघाडी आहे अशी चर्चा करत असाल, तर मग तिकीट वाटप कसं होणार? आता तीनचा प्रभाग आहे. कोणाला कोणाला तिकीट मिळणार? पण, काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच सांगितलं आहे आम्ही निवडणुका स्वबळावर लढणार! मी सांगितलं नाही, त्यांनी आधी सांगितलं आहे. त्यांचा तर प्रश्नच मिटला आहे. ते स्वबळावर लढणार आहेत.”

“…तर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढेल”

“इथं कुणाचं बळ किती आहे त्याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचं बळ चांगलं आहे अशा त्यांना शुभेच्छा देऊ. परंतु, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल राष्ट्रवादीच्या बरोबर जाण्याची आमची तयारी आहे असं वाचलं. अशी भूमिका मित्रपक्ष घेत असतील तर आपण पण दोन पावलं पुढे मागे सरकून जायचं असतं. त्याबद्दलची मानसिकता आपली आहे. जे आपल्या बरोबर येऊ पाहत आहेत त्यांनी पण राष्ट्रवादीची ताकद किती आहे त्या ताकदीच्या प्रमाणात जागा वाटप झाल्यास काहीच अडचण असण्याचं कारण नाही. दोघांचं ध्येय एकच आहे, भाजपला पराभूत करायचं आहे,” असं अजित पवार म्हणाले.

“शेवटची निवडणूक आहे एवढ्या वेळेस बघा म्हणणारा पण वर्ग”

अजित पवार म्हणाले, “महानगर पालिकेच्या निवडणुकीत शहरात आपल्या जागा वाढणार आहेत. फार काही समाधान देतील एवढ्या वाढणार नाहीत. त्याच्यामुळे काही लोकांना वाटणार की ही शेवटची निवडणूक आहे एवढ्या वेळेस बघा, असा म्हणणारा पण वर्ग आहे. मुलाखती घेत असताना पाचव्यांदा येतोय आता तरी लक्ष द्या अस पण मला ऐकायला लागणार आहे. त्या संदर्भात मी वेगळीच भूमिका घेतली आहे. बारामतीमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणाला फॉर्म भरायचे आहेत ते भरा असं म्हटलं त्यानंतर पॅनल जाहीर करू. त्यांना सांगितलं इतरांनी फॉर्म मागे घ्या सुदैवाने सर्वांनी घेतले आणि बिनविरोध निवडून आलोत, कधी नव्हे ते बारामतीमध्ये माझ्यासारख्याची बिनविरोध लॉटरी लागली.” 

“ओबीसी जागांच्या निवडणूका होणार नाहीत हे बरोबर नाही”

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “ओबीसींबाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला. आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारच्या मार्फत असं ठरवलं आहे की, त्यांनी तसा निर्णय घेतला असेल तर निवडणूका देखील सर्वांच्या एकत्र घ्या. त्याबद्दलचा निर्णय द्या. बाकीच्या जागांच्या निवडणूका होतील तर सर्वसाधारण जागा, मागासवर्गीयांच्या जागा, आदिवासींच्या जागा आणि ओबीसी जागांच्या निवडणूका होणार नाहीत हे बरोबर नाही.”

हेही वाचा : “…तर दुसरा डोस न घेणार्‍यांवर कारवाईचा निर्णय”, बारामती, इंदापूर, दौंडकरांचा उल्लेख करत अजित पवारांचा इशारा

“न्याय व्यवस्थेला त्यांचा न्याय देण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्याबद्दल दुमत नाही. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण, ठराविकच व्यक्तींना संधी मिळणार आणि ठराविक मोठ्या वर्गाला थांबावं लागणार हे बरोबर नाही. त्याकरिता छगन भुजबळ यांना दिल्लीला पाठवलं आहे. चांगले वकील लावले आहेत. प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. ते राज्य सरकारच्यावतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. यात काही जण राजकारण करत आहेत,” असं अजित पवार यांनी नमूद केलं.

Story img Loader