पुणे : महायुतीचे जागा वाटप अद्यापही निश्चित झालेले नसताना सातारा, नाशिक आणि माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही पवार यांची भेट घेतल्याने सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात अदलाबदली होईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, अजित पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतली असून आज गुरुवारी (२८ मार्च) सर्व चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिकची जागा शिवसेनेकडे असून हेमंत गोडसे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आग्रही आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मतदारसंघ हवा आहे. महायुतीच्या जागा वाटपात सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र सातारमधून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाची अदलाबदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेचीही कोंडी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> अजित पवार यांचा पैलवानांना ‘खुराक’; जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मदत करण्याचे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांची अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मंगळवारी (२६ मार्च) बैठक झाली होती. त्यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी या लोकसभेच्या सात जागांसंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर अजित पवार यांनी बुधवारी पैलवानांचा मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर पुन्हा सातारा, नाशिक आणि माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यात आली.

महायुतीच्या जागा वाटपामध्ये सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, या मतदारसंघातून राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले भाजपकडू्न लढण्यास इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत. त्यामुळे सातारा आणि नाशिक या जागांवरील तिढा निर्माण झाला होता. त्यातच सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सातारची जागा भाजपला दिली असून नाशिकची जागा घेतल्याचे स्पष्ट होत आहे. छगन भुजबळ यांनीही अजित पवार यांची भेट घेतल्याने या चर्चेला जोर मिळाला आहे. मात्र, त्याबाबत अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे.

हेही वाचा >>> पुण्यातील प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे दर्शन; अराजकीय व्यासपीठावर उमेदवारांची शहर हिताची चर्चा

सातारा, नाशिक आणि माढा मतदारसंघासंदर्भात चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, महायुतीचे जागा वाटप गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यावेळी सर्व मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल. कोणी कोणत्या जागेची मागणी केली तरी, महायुतीचे वरिष्ठ नेते त्याबाबतचा निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी राजकारणात कोणतीही शक्यता असते. सातारच्या जागेबाबतचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून घेतला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे नाशिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची अदलाबदल होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

वंचितच्या भूमिकेवर भाष्य वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. वेळ पडल्यास बारामतीमधूनही वंचित उमेदवार देईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचा फायदा बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला होईल, अशी चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, की आंबेडकर वंचितचे प्रमुख नेते आहेत. त्यांची राज्यात मोठी ताकद आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना त्याचा फटका बसला होता. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, राजेश विटेकर यांच्यासारखे नेते पराभूत झाले होते.