पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधकांनी डोकी वर काढल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुभंगलेली मने जोडण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा विरोध कमी केल्यानंतर आता पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा राग शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या गुरुवारी ‘जनसंवाद सभा’ घेतली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील अजित पवार यांच्या राजकारणाचा हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांना कायमच त्रास होत आला आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार यांच्याविरुद्धचा वाचपा काढण्याची ही नामी संधी समजून हर्षवर्धन पाटील आणि शिवतारे यांनी बंडाचा झेंडा उभारला. दोघांनीही अजित पवार यांना उघड आव्हान दिले. त्यामुळे अजित पवार यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी या दोघांच्याही विरोधाची धार कमी करण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर येथे महायुतीची सभा घेऊन फडणवीस यांनी मने जुळल्याचे भासविल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सासवड येथे येत्या गुरुवारी जनसंवाद सभा घेतली जाणार आहे. या सभेत मुख्यमंत्री शिंदे हे अजित पवार आणि शिवतारे याच्यातील दिलजमाईचे कसे दर्शन घडविणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच शिवतारे यांची मवाळ भाषाशैलीही मतदारांना पहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना

इंदापूरचे पालकत्त्व फडणवीसांकडे

बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांना हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे विरोध केला. त्यामुळे अजित पवार यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला. अजित पवार यांच्या राजकारणामुळे हर्षवर्धन पाटील यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे अजित पवारांच्या राजकारणाला खंड पाडण्याची ही संधी असल्याचे पाहून हर्षवर्धन पाटील यांनी मुलीला उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला. तसेच ते उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना शांत करण्यासाठी गेल्या आठवड्यात इंदापूरमध्ये महायुतीचा मेळावा घेण्यात आला. त्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूरचे पालकत्व स्वीकारले असल्याचे जाहीर करत हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधाची धार कमी केली आहे.

शिवतारे यांची मनधरणी

पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे आगामी काळात धोका असल्याचे लक्षात आल्यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवतारे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘तू निवडून कसा येतो तेच पाहतो’ असे वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांची भाषा मवाळ झाली आणि ‘आरेला कारे म्हणणार नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शिवतारे हे आक्रमक भूमिकेत होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अजित पवारांवर त्यांनी ‘अरे तुरे’च्या भाषेत टीका केली. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांच्या विरोधात साडेपाच लाख मते आहेत. ही मते आपल्यालाच मिळतील, असा दावा करत शिवतारे यांनी दंड थोपटले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शिवतारे यांचा विरोध मावळू लागला. त्यांनी उमेदवारीची तलवार म्यान केली. त्यानंतर सासवड येथे कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊन पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवतारे यांची भाषा आता मवाळ झाली आहे.

हेही वाचा – खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार आले, पार्थ पवार येणार?

सुनेत्रा पवार यांनीही शिवतारे यांच्या सासवड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून ५० हजारांचे मताधिक्य दिले जाईल, असे आश्वासन शिवतारे यांनी सुनेत्रा पवारांना दिले. आता सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी येत्या गुरुवारी पुरंदर येथे जनसंवाद सभा घेतली जाणार आहे. या सभेत शिवतारे हे सुनेत्रा पवार यांना ५० हजारांचे मताधिक्य कसे देणार, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.