पुणे : पुणे शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा येरवड्यातील अण्णाभाऊ साठे कलामंदिर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार सुनिल टिंगरे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांची नावे आहेत. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अजित पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवर नाही.
विशेष म्हणजे, अजित पवार शनिवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. दुपारी चार वाजता एका पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यानंतर सायंकाळी पिंपरी चिंचवड येथे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर इतर राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकऱ्यांना श्रेय न देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांची परवानगी घ्यावी, असे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला अजित पवारांना बोलविण्यात आलेले नाही आणि कार्यक्रम पत्रिकेतही नाव टाकण्यात आलेले नाही.