भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या भ्रष्टाचारावरून थेट मुख्यमंत्र्यावर आरोप केले आहेत. या कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोविड सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. पुण्यात करोना आढावा बैठकीत बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.
“पुण्यात करोनाचे सावट आले तेव्हापासून कामे करत असताना अतिशय पारदर्शक पद्धतीने व्हावीत यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केला आहे. आपण जी कामे केली आहेत त्यामध्ये राज्यसरकार, जिल्हा वार्षिक योजना, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा हिस्सा आहे. जम्बो कोविड सेंटर उभे करताना कोणत्याही पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्याला सामील करण्यात आले नाही,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
“पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील आणि जिल्हाधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांचा कोविड सेंटरच्या कामामध्ये समावेश होता. या अधिकाऱ्यांना अतिशय पारदर्शकपणे हे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आजच्या बैठकीत पहिल्यांदा त्यावरच चर्चा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी हे काम कसे केले आहे याची माहिती देण्यात आली आहे. कोविड सेंटरच्या बाबतीत काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या आले होते, मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले आणि सोमय्या यांना परतावे लागले. गोंधळात खाली पडल्यामुळे सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर आक्रमकपणे सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. त्यावर आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निर्बंधात शिथिलता आणण्याचा प्रयत्न सुरू
चित्रपटगृहांमध्ये ५० टक्के उपस्थिती ठेवून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. इतर कार्यक्रमाला मात्रं बंधनं आहेत. लग्न समारंभांना बंधन आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची क्षमता असेल तर एक हजार लोकांना परवानगी मिळत नाही. फक्त दोनशे लोकांनाच परवानगी आहे. त्यामुळे या निर्बंधात शिथिलता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. हळूहळू सर्व नियम हटवण्याची गरज आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच जोपर्यंत करोना संपत नाही तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.