पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौर्यावर होते. सकाळी ९ वाजता रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर, उपस्थित नागरिकांनी माहेश्वरी समाजाच्या श्रीराम मंदिरात दर्शनाला यावे, असा आग्रह केला. त्यावर अजित पवार मंदिरात जाण्यासाठी निघाले.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अजित पवार यांना कचर्याचा ढीग दिसताच, “इतके भव्य दिव्य मंदिर असून येथे कचरा उचलला नाही? कोणीही असले तरी साफसफाई ठेवली पाहिजे,” असे सांगत अजित पवारांनी बाजूला असलेल्या विश्वस्तांना फटकारले. त्यावर विश्वस्तांना काही उत्तर देता आले नाही.
हेही वाचा…पुणे : बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेली मतिमंद मुलगी सापडली
त्यानंतर अजित पवारांनी मंदिरात प्रवेश केल्यावर सर्व बाजूला पाहिले. त्यावेळी फॅनवर धूळ दिसली. तसेच गाभाऱ्यात जाताना ताराचा पडदा दिसला. या सर्व गोष्टी पाहून, “मंदिर परिसरात स्वच्छता ठेवा, मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. हे योग्य नाही,” असे म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. “दादा, तुम्ही आमचे कान टोचले आहेत. आम्ही नक्की यामध्ये सुधारणा करू,” असे विश्वस्तांनी आश्वासन दिले.
हेही वाचा…बारामतीमध्ये लढण्यात रस नाही – अजित पवार
मंदिराच्या बाहेर पडत असताना प्रवेशद्वारा जवळ पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी विचारले, “हा कचरा कधी काढायचा?” “दादा, माती आहे,” असे कर्मचाऱ्यांनी सांगताच अजित पवारांनी त्यांच्या समोर हात जोडले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
© The Indian Express (P) Ltd