Ajit Pawar Faces BJP Protest in Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने आज (रविवार, १८ ऑगस्ट) जुन्नरमधील नारायणगावात जनसन्मान यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी नारायणगावात येणाऱ्या अजित पवारांना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजपा कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्याकडेला उभे होते. त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला हे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शने केली. भाजपाच्या या विरोधामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांविरोधात केलेल्या निदर्शनांमुळे अजित पवार गटातील नेते देखील आक्रमक झाले आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

सुनील तटकरे म्हणाले, आम्ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी याविषयी बोलणार आहोत. तर याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान, निदर्शने करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की येथे शासकीय बैठक बोलावली आहे. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नाही. “ते (अजित पवार) पुण्याचे पालकमंत्री असतील तर त्यांनी या जिल्ह्याचं पालकत्त्व घ्यायला हवं. ते करण्याऐवजी ते त्यांचं वैयक्तिक राजकारण करत आहेत.” तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली.

अमोल मिटकरी आक्रमक

अमोल मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवरील नाराजी जाहीर केली. मिटकरी म्हणाले, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा.

हे ही वाचा >> मराठ्यांना देश चालवायचाय, आरक्षण कसले मागता? संभाजी भिडेंचा मराठा समाजाला सवाल

भाजपा कार्यकर्त्यांच्या आरोपांना तटकरेंचं उत्तर

भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) प्रश्न विचारला आहे की हा तुमच्या पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम होता तर तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाला का बोलावलं होतं? भाजपा कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की येथे पर्यटन विभागाची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. यावर सुनील तटकरे म्हणाले, कोण काय बोलतंय त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. परंतु, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा दौरा असेल तर राजशिष्टाचार म्हणून अधिकाऱ्यांना येथे येणे भाग आहे, त्यामुळे ते या कार्यक्रमाला आले.