आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुतारी वाजली. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या विधानाने उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार हशा पिकला.
दीड वर्षापूर्वी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार हे काही आमदार सोबत घेऊन शिंदे, फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. या नव्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदावर विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांनी थेट पक्षावर दावा करत पक्षाचे नाव आणि चिन्ह सर्व प्रक्रिया पार पडत मिळविले. तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्षातील वादावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्याच दरम्यान दुसर्या बाजूला शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिले आणि तुतारी हे चिन्ह दिले. त्या सर्व झालेल्या राजकीय घडामोडीदरम्यान लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा महायुतीला अधिक फायदा होईल असे वाटत होते. मात्र त्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आणण्यात यश आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीला अधिक यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभरात दौरे, मेळावे आणि बैठका घेतल्या जात आहे. त्याच दरम्यान गणेशोत्सव सुरू झाला असून पुणे शहरात विविध पक्षांचे नेतेमंडळी गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत.
हेही वाचा – गणेशोत्सवात चोरट्यांचा उच्छाद; कर्वेनगर, खडकीत महिलांचे दागिने चोरी
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यावेळी मानाचा पहिला कसबा गणपती मंडळामार्फत तुतारी वाजवणारी व्यक्ती त्या ठिकाणी येणार्या विशेष पाहुण्यांचे तुतारी वाजवून स्वागत करीत होती. त्याप्रमाणे अजित पवार हे आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास सुरुवात करणार त्याबरोबर तुतारी वाजविण्यात आली. अजित पवार तुतारी वाजविणार्या व्यक्तीला म्हणाले की, मी थांबविण्याचा प्रयत्न करतोय आणि तू वाजवतोय. असे म्हणताच उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.