पिंपरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यवरांच्या गणपतींसह विविध मंडळांच्या श्रीगणेशाचे दर्शन घेण्याचा सपाटा गेल्या काही दिवसांपासून लावलेला आहे. त्यातच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही तोच कित्ता गिरवला आहे. गुरूवारी (८ सप्टेंबर) अजितदादा पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. फक्त गणेश मंडळांच्या भेटींचा कार्यक्रम, असे या दौऱ्याचे स्वरूप असणार आहे.

हेही वाचा : मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झाडपडी

हेही वाचा : पुरंदर विमानतळासाठी जमिनी न देण्याचा सात ग्रामपंचायतींचा ठराव; फडणवीस यांना निवेदन

गुरूवारी दुपारी अजित पवार काळेवाडीत येणार आहेत. तेथून सुरू होणारा भेटीगाठींचा त्यांचा दौरा रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. एकाच दिवशी ३० मोठ्या गणेश मंडळांना ते भेट देणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळांच्या गणेश आरतीसह उत्सवातील इतर कार्यक्रमांनाही ते हजेरी लावणार आहेत. गणेशोत्सवाशी संबंधित कार्यक्रमांचाच या दौऱ्यात समावेश करावा, अशी स्पष्ट सूचना पवारांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिली आहे. त्यादृष्टीने या दौऱ्याची राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. अजित पवारांच्या वलयाचा वापर करून पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या शहरात वातावरणनिर्मिती करण्याचा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे.

अजित पवार पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात १९९२ पासून सक्रीय आहेत. जवळपास ३० वर्षांच्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे त्यांना शहराविषयी सूक्ष्म माहिती आहे. अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा थेट संपर्क आहे. करोनानंतरच्या काळात इतर शहरांप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. शहरवासियांच्या आनंदात सहभागी होण्याबरोबरच मंडळांमध्ये विखूरलेल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अजित पवार शहरात येत असल्याचे शहर राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. ज्या-ज्या ठिकाणी अजित पवार जाणार आहेत, त्या ठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

Story img Loader